Monday 2 December 2013

प्राचार्यांची जबाबदारी

प्राचार्यांची जबाबदारी

प्राचार्य कोणत्याही शिक्षणसंस्थेचा कणा असतो. शिक्षणसंस्थांचे नेतृत्व करणे, त्यांच्या वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन करणे आणि या शिक्षणसंस्थेतील एकूण व्यवस्थापनाचे समन्वय करण्याची जबाबदारी असते. शिक्षण व्यवस्थेचा गाभा असणाऱ्या अध्ययन आणि अध्यापनामध्ये सातत्याने विकास करणे आणि बदलत्या काळानुसार त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी प्राचार्याची असते. त्यामुळे एकूण शिक्षण संस्थांच्या वाटचालीमध्ये प्राचार्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.
शाळा किंवा महाविद्यालय या शैक्षणिक संस्था असल्या तरी, त्यामध्येही व्यवस्थापन आणि प्रशासकीय रचनेची आवश्यकता असतेच. या सर्व रचनेसाठी आणि त्याच्या कार्यक्षमतेसाठी प्राचार्य जबाबदार असतो. शाळांची संपूर्ण संघटनात्मक रचना, शैक्षणिक रचना यांची गरज, वेळेची उपलब्धता आणि त्या वर्षाची गरज यांचा विचार करून योग्य पद्धतीने आखणी करण्यासाठी प्राचार्याचा प्रयत्न असतो. तसेच, शाळेतील अभ्यासक्रमासाठी आणि अन्य कामांसाठी योग्य व्यक्तींमध्ये कामांची विभागणी करणे, त्यांच्या वेळांचे नियोजन करणे ही कामे प्राचार्याने करणे अपेक्षित असते. एकूणच, शैक्षणिक संस्थांच्या सुरळीत कामकाजासाठी प्राचार्य हाच जबाबदार असतो आणि त्याचेच स्थान सर्वोच्च असते.
शैक्षणिक संस्थेचे नेतृत्वच प्राचार्याकडे असल्यामुळे, या संस्थेचा दर्जा राखण्याची जबाबदारीही प्राचार्याची असते. सध्याच्या काळामध्ये एकूण परिस्थितीमध्ये वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे या बदलांचे भान ठेऊन आणि त्यातील अभ्यासक्रमातील गरज लक्षात घेऊन बदल घडवून आणणारा प्राचार्य हाच सर्वोत्तम असतो. त्यासाठी आवश्यक माहितीचे वाचन करणे, योग्य संस्थांच्या कार्यशाळा, अहवाल यांतून अधिकाधिक चांगल्या माहितीचे संकलन करणे आणि ही माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविणे, हे कामही प्राचार्याचे असते. तसेच, सध्या केंद्र आणि राज्य सरकारने शिक्षणातील बदलांसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे सरकारच्या या योजनाही अमलात आणण्यासाठी प्राचार्याच जबाबदार असतो. त्यामुळेच, एकूणच शिक्षण संस्थांच्या एकूण संस्थांच्या वाटचालीमध्ये प्राचार्यांची भूमिका महत्त्वाची असते.

No comments:

Post a Comment