Monday 2 December 2013

शाळेची निवड

शाळेची निवड

मुले लहान असतानाच  त्यांना बालवाडीत घालायचं की प्राथमिक शाळेत? हा विचार प्रत्येक पालकांना करावा लागतो. नोकरी करणा-या पालकांना मात्र या आधीचा विचार करावा लागतो. आई आणि वडील दोघेही नोकरी करणारे असतील तर त्यांना आपल्या लहानग्यांना आधी पाळणाघरात आणि त्यानंतर पूर्व प्राथमिक शाळेत घालण्यावाचून दुसरा पर्यायच  नसतो. अशाप्रकारची व्यवस्था सरकारी पातळीवर होत नसल्याने दुर्दैवाने ती फार खर्चिक आहे. पण आपल्या आसपासच्या भागात चौकशी केली तर काही चर्चेस आणि खाजगी तसेच  सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चालवली जाणारी पाळणाघरे आणि पूर्व प्राथमिक शाळा यांची माहिती आपल्याला मिळू शकेल. इथे आपल्या पाल्याची उत्तम देखरेख, काळजी घेतली जाते ते ही अत्यंत कमी खर्चामध्ये. 
बहुतेक सरकारी शाळांना ‘अ’ दर्जा दिला जातो. पण आपल्या पाल्याने ‘अ’ असलेल्या शाळेतच जावे ही कोणत्याही पालकाची अपेक्षा असते. काही सरकारी शाळांची कामगिरी एखाद्या विभागात चांगली असते. उदा. काही शाळा  आपल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही क्रीडा प्रकारात उत्तम असतात तर काही शाळा कलेच्या क्षेत्रात नावाजलेल्या असतात. बरेच पालक आपल्या पाल्यासाठी शाळा निवडताना  घरापासून जवळची आणि सोयीस्कर शाळा निवडतात. तरीही उत्कृष्ट शाळेचा त्यांचा शोध सुरूच असतो. काही शाळाही शाळेत प्रवेश देतांना जवळच्या भागात राहणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य देतात. मात्र तुमच्या पाल्याने चांगल्या शाळेत, मग ती दूर असली तरी तिथे जावे असे वाटत असेल तर ‘अ’ दर्जा असलेल्या शाळेत घालणे हाच उत्तम पर्याय असू शकेल.
स्वतंत्र किंवा खाजगी शाळा फार खर्चिक असल्या तरी त्यांच्याकडे चांगल्या सुविधा उपलब्ध असतात. हा विचार तुमचा पक्का झाला की आपल्या मुलासाठी हवी तशी शाळा शोधायला सुरुवात करा.

आश्रम शाळा

महाराष्ट्रातील अनेक डोंगराळ व दुर्गम भागातील मुलांना शिक्षण उपलब्ध होत नाही. शाळा दूर असल्याने त्यांना रोज ये-जा करणे कठीण होते.  अश्या दुर्गम व  डोंगराळ भागातील, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने आश्रम शाळा बांधल्या आहेत. अश्या भागातील लोकांचा मुलभूत विकास होण्यासाठी आश्रम शाळा या मूळ केंद्रस्थानी  ठेवण्यात आल्या आहेत. जिथे इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. परंतु इथे येणारया विद्यार्थ्यांना काही  अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. हे विद्यार्थी आदिवासीच असावे. विद्यार्थ्यांनी वयाची पाच वर्ष पूर्ण  केल्यानंतरच इथे  प्रवेश दिला जातो.  प्रवेशाच्या वेळी जातीचा दाखला आणि जन्मतारखेचा दाखला त्यासोबतच आई वडिलांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इयत्ता पहिलीत  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांव्यातीरिक्त विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला द्यावा लागेल. 
परंतु शिक्षण हक्क कायद्यातील रतुदींनुसार ही  अट आता ग्राह्य धरता  येणार  नाही. या आश्रम शाळेत मुला आणि मुलींचे प्रमाण पन्नास पन्नास टक्के असणे अपेक्षित असते. याशिवाय दारिद्र्य रेषेखालील आदिवासींना यात  प्राधान्य देण्यात येते. अपंग विद्यार्थ्यांसाठी तीन  टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतात.  इथे प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला निवास, भोजन, गणवेश, अंथरून, पांघरून, पुस्तक व इतर  लेखन साहित्य इत्यादी  सुविधा शासनाकडून मोफत पुरवण्यात येतात.  
शासकीय  आश्रम शाळांशिवाय इतर अनेक खासगी संस्थांकडून देखील आश्रम शाळा चालवण्यात येतात.  त्या   संस्थांकडूनच  त्यांना  अर्थसाह्य  केले जाते. काही  खासगी आश्रम शाळांत देखील मोफत शिक्षण व सर्व सुविधा पुरवण्यात येतात. तर काही आश्रम शाळा अत्यंत  नाममात्र  शुल्क  आकारतात. याशिवाय स्वेच्छेने आश्रम चालवणाऱ्या संस्थांना  सरकारकडून  अर्थसाह्य देखील मिळते.  यामध्ये  शासनाच्या  केंद्र  पुरसृत  सरकारी शाळा देखील आहेत. अनुदानित  आणि शासकीय आश्रम शाळा प्रोत्साहनपर  बक्षीस योजनाही अस्तित्वात आहे. ज्या आश्रम शाळा उत्तम कामगिरी करतात अशा शाळांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळण्याची योजना आहे. पुण्यात आंबेगाव आणि  भोर येथे शासकीय  आश्रम आहेत.

रात्र शाळा

रात्र शाळा ही संकल्पना अस्तित्वात येण्याचे कारण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे काम  करत इच्छा आहे  अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. अनेक लोकांचा गैरसमज असतो  की रात्र शाळेची वेळ ही मध्यरात्रीची रात्रीची असते. परंतु ही वेळ संध्याकाळी  सहा ते रात्री साधारण दहा- आकारा पर्यंत असते. गरीब विद्यार्थ्यांना काम करता करता शिकता यावे  हाच या रात्र शाळांमागील मुख्य हेतू आहे.  रात्र शाळांबरोबरच रात्र महाविद्यालये देखील आहेत. रात्र शाळांपेक्षा रात्र महाविद्यालयांना चांगला प्रतिसाद मिळतो. रात्र शाळांची वेळ वगळता संपूर्ण शिक्षण हे इतर शाळांप्रमाणेच असते. शिक्षक, शिक्षण, अभ्यासक्रम, परीक्षापद्धती या सर्व गोष्टी इतर शाळांप्रमाणेच असतात.  वयाच्या चौदा वर्षापर्यंतचे शिक्षण प्रत्येक  विद्यर्थ्याला मोफत असल्यामुळे शासकीय रात्र शाळेत वयाच्या चौदा वर्षापर्यंतचे शिक्षण देखील मोफत असते.  अनेक रात्र शाळा या खासगी संस्थांमार्फत चालवल्या जातात. त्यातील अनेक संस्थांना सरकारी अनुदानही मिळते.
रात्र शाळा  व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेत गुणांची अट मात्र नसते.विद्यार्थ्यांची गरज पाहून त्याला प्रवेश दिला जातो.  या शाळांतही मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आरक्षण देण्यात येते.  आणि इथेही विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के हजेरी भरणे आवश्यक आहे. परंतु काही   विद्यार्थ्यांना ही हजेरी भरणे शक्य नसेल तर त्यांच्या अडचणी समजून घेऊन तशी सवलतही देण्यात येते. शाळा पातळीवर मुलींची संख्या  कमी असली तरीही महाविद्यालयीन पातळीवर मुलींचा चागला प्रतिसाद असतो. एखाद्या विद्यार्थ्याला  महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला काम करत असल्याचा पुरावा सादर करण्याची सक्ती नसते. एखादा विद्यार्थी काम करत नसेल तरीही त्याला रात्र शाळेत प्रवेश घेण्याची परवानगी असते. रात्र शाळेमुळे मुलांना स्वावलंबी बनून स्वतःचे शिक्षण स्वतः पूर्ण करता येते. पुण्यातही अनेक रात्र शाळा आहेत. सरस्वती विद्या मंदिर, अत्रे रात्र शाळा, अबेदा इनामदार रात्र महाविद्यालय, एमआयटी रात्र महाविद्यालय आहेत.

शाळा निवडीचे निकष

आपल्या मुलासाठी शाळा निवडताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. मग तुमचा पाल्य पहिल्यांदाच शाळेत जाणार असो की त्याची सुरु असलेली शाळा बदलायची असो. शाळा निवडीचे निर्णय अत्यंत महत्त्वाचे असतात, पण तुमच्यासाठी असलेले चांगले पर्याय कोणते? 
वर्ग संख्यावर्गामध्ये असलेल्या पटसंख्येवरही तुमचा पाल्य कसा अभ्यास करेल हे अवलंबून असते. बहुतेक सरकारी शाळातील वर्गांची पटसंख्या मोठी असते. पण तुम्ही जरा शोध घेतला तर लहान पटसंख्या असलेल्या वर्गांच्या शाळाही तुम्हाला नक्कीच सापडतील. स्वतंत्र आणि खाजगी शाळांमध्ये असे लहान वर्ग आपल्याला दिसतात. 
शाळेची इमारतकाही मुले मोठ्या शाळेत चांगली रमतात. तिथे त्यांच्या बरोबर खेळणारी अनेक मुले असतात. शिवाय वर्गही बरेच असतात. लहान शाळांमध्ये वर्गही कमी असतात शिवाय मुलं कमी असल्यामुळे शिक्षक आणि मुलांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. सरकारी शाळा या आकाराने मोठया असतात, त्यांचे वर्गही मोठे असतात. आणि तिथेसुद्धा   समर्पित आणि मेहनती शिक्षक असतात. हे शिक्षक तुमच्या पाल्याकडे वैयक्तिक रित्या लक्ष देऊ शकतात, ज्याची मुलांना फार गरज असते.
शाळेचे ठिकाणअनेक कुटुंबाना जवळच्या आणि सोयीस्कर शाळा हव्या असतात. परंतु शाळेतून येत जाताना मुलाच्या सुरक्षिततेचीही हमी आपल्याला हवी असते. शिवाय या ठिकाणी मुलासाठी आवश्यक असलेले ग्रंथालय, स्वीमिंग पूल अशा सोयी आहेत का ते ही आपण पाहतोच.
विविधताअनेक पालकांना शाळेमध्ये सर्व जाती, धर्म, वर्ग आणि वर्णाच्या मुलांचा समावेश असावा असं वाटत असतं. सांस्कृतिक विविधतेची ओळख आपल्या मुलाला करून देण्यासाठी आपल्या समाजाच्या बाहेर डोकावणं अत्यंत आवश्यक असतं. 
शाळेची फीसरकारी शाळांमध्ये सरकारी नियमांप्रमाणेच फी आकारली जाते. पण जी फी जर तुम्ही नाही देऊ शकला तरी तुमच्या मुलाला डावललं जात नाही. शाळांमध्ये मुलींसाठी मोफत शिक्षणाची सोय असते तर मुलांसाठी अभ्यासक्रमाची पुस्तकेही दिली जातात. प्राथमिक शिक्षण हा त्याचा अधिकारच आहे. तेच जर तुम्ही स्थानिक, खाजगी शाळांमध्ये पाहिलं तर फीच्या व्यतिरिक्त पुस्तकं, वह्या, गणवेष त्याचप्रमाणे इतर वस्तू यांच्यावर लादलेली छुपी फी आपल्याला दिसते. काही शाळांमध्ये सवलतीही दिल्या जातात. उदा. भावंडांच्या फीमध्ये सवलत मिळते. स्वतंत्र-खाजगी शाळा मात्र फार मोठी रक्कम फीच्या रुपाने आकारतात. त्यात कोणतीही सवलत दिली जात नाही. पण तिथे होतकरू विद्यार्थांसाठी अनेक ग्रँट आणि शिष्यवृत्त्या दिल्या जातात.

No comments:

Post a Comment