Monday 2 December 2013

माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी

माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी

माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकावर विविध प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. मुख्याध्यापक हा एक शिक्षक तर असतोच परंतु त्याच बरोबर तो एक उत्तम प्रशासकही असावा लागतो. विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक, नैतिक, सामाजिक विकासापासून ते पालकांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या पगारापर्यंत सर्वच गोष्टींची काळजी मुख्याध्यापकाला घ्यावी लागते. वेगवेगळया स्तरांवरील त्यांच्या जबाबदाऱ्यांचा थोडक्यात विचार करू. 
१. शाळेतील जबाबदाऱ्या: संपूर्ण वर्षाचे नियोजन करणे, विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती तपासणे, शिक्षक वेळेवर त्यांना दिलेल्या तासिका घेतात कि नाही ते तपासणे, त्यांचे मूल्यमापन करणे, वार्षिक, सहामाही, घटक चाचणी इत्यादी परीक्षांचे नियोजन करणे, सांस्कृतिक, कलाविषयक आणि क्रीडा कार्यक्रमांचे नियोजन करणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांची अध्यायावतता सांभाळणे, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यासंबंधीत कार्यक्रमांचे नियोजन करणे, विविध स्पर्धांचे आयोजन बक्षिश वितरण करणे, शाळेतील कार्यक्रमांच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणे, इत्यादी 
२. प्रशासकीय: शिक्षकांच्या सुट्ट्यांचे नियोजन, शिक्षणाधीकाऱ्यांना रिपोर्टिंग, सर्विसबुक मेंटेनन्स, आवक-जावक पाहणे, शाळेच्या इमारतीची डागडुजी करून घेणे, त्यासंबंधित खर्चाचा हिशेब ठेवणे, विविध विषयांवर शिक्षकांच्या, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेणे, विविध उच्चस्तरीय बैठकींना उपस्थित राहणे, इत्यादी. थोडक्यात शाळेच्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून सर्वच स्तरांवर कामकाज योग्यरीत्या होत आहे कि नाही हे पाहण्याची जबाबदारी मुख्याध्यापाकावरच असते.
३. विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील दुवा: कुठलीही तक्रार किंवा विनंती असल्यास पालक सर्व प्रथम मुख्याध्यापाकांनाच भेटतात. पालक-शिक्षक-विद्यार्थी संवाद घडवून आणण्यासाठी पालक सभा आयोजित करणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल पालकांना अवगत करणे,  इत्यादी
४. सामाजिक: सर्वात वरिष्ठ वा जबाबदार शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनवणे, त्यांना चारित्र्यसंपन्न बनवणे, त्यांच्यात सामाजिक भान निर्माण करणे, देशभक्ती वाढविणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, एकोपा वाढवणे या जबाबदाऱ्याही मुख्याध्यापकावर असतात. 
५. तक्रार निवारण: विद्यार्थी, पालक, शिक्षक, इतर कर्मचारी सर्वांच्या तक्रारींचे निवारण मुख्याध्यापकाला करावे लागते. 
अशा प्रकारे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पद हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्या पदावर असणारी व्यक्ती अत्यंत कर्तव्यनिष्ठ असली पाहिजे. तिच्यावर असलेल्या वर उल्लेखित व अनुल्लेखित अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्यांचे तिला योग्य भान असायला हवे. तरच ती त्या पदाची प्रतिष्ठा आणि आपल्या शाळेची गुणवत्ता जपू शकेल.  

No comments:

Post a Comment