मुलाला शाळेत पाठवण्याची पूर्वतयारी
मुलाची शाळेत जाण्याची तयारी त्याच्या अगदी लहान वयातच करावी लागते. काही गोष्टींवर अधिक लक्ष देऊन मुलाची ही तयारी आपण करू शकता.
सामान्य ज्ञानआपल्या मुलाला स्वत:चे पूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वाढदिवस या गोष्टी व्यवस्थित शिकवा. जेंव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेरच्या जगाविषयी काही प्रश्न विचारतात तेंव्हा त्या प्रश्नांची शक्य तेवढी योग्य उत्तरे द्या. किंवा त्या उत्तरांचा शोध घ्यायला त्यांना अन्यप्रकारे मदत करा.
स्वयंसहायता तुमच्या मुलाला स्वत:चे कपडे घालणे आणि बदलणे ही जमले पाहिजे. त्याला झिप, बटन्स, प्रेस बटन्स, वेल क्रो यांचा वापरही कळायला हवा. शाळेचे बूट ही त्यांचे त्यांनाच घालता आले पाहिजेत. आपले नाक साफ करणे आणि स्वच्छ्तालयात स्वत:हून जाणे या गोष्टीही त्याने स्वत:च केल्या पाहिजेत.
त्यांच्या वस्तूंना नावे द्यातुमच्या मुलाच्या वस्तू, कपडे यांना व्यवस्थित खुणा करा. या खुणा ओळखून त्यांची जागा त्यांना कळू दे. याचा फायदा त्यांना आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवण्यासाठी होईल. त्याला आपल्या वस्तूंची जबाबदारी ओळखायला शिकवा. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा तर वाचतोच शिवाय तुमची मुलं ब-याच चांगल्या सवयी शिकू शकतात.
मुलांचा आहारमुलांचा सकाळचा नाश्ता आणि त्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी दिला गेलेला सकस आहार (टिफिन) यामुळे मुलांचा अभ्यास उत्तम होत असतो. जर तुमचा मुलगा जेवायला घरी येत असेल तर गव्हाच्या चपाती, सँडवीच आणि एका फळाचा तुकडा त्याच्या साठी पुरेसा असतो. जर त्याची शाळा दुपारची असेल किंवा दुपारचे जेवण मिळणे अशक्य असेल अश्याप्रकारे शाळेची वेळ असेल तर एक ज्यादा सँडवीच त्याला द्यावे. त्यात थोडे दाणे, गाजर आणि काही भाज्या घालाव्यात. पॉपकॉर्न, चिप्स आणि कोल्डड्रिंक्स पेक्षा चपाती, सँडवीच आणि फळांचा रस हे किफायतशीर आणि आरोग्यदायीही असेल.
शाळापूर्व तयारी
शाळापूर्व तयारीमध्ये सर्वप्रथम शिक्षक आणि पालक यांचा संपर्क होणे महत्वाचे असते. ज्या वस्तीत किंवा परिसरात शाळा सुरु करायची आहे तेथे शिक्षक जाऊन पालकसभा घेतात. पालकांच्या सोयीनुसार आणि चर्चेतून विचार-विनिमय करून शाळेची जागा, वेळ, शालेय शुल्क ठरवले जाते. जे पालक शुल्क भरू शकत नाही, अशांसाठी परिसरातील देणगीदारांची व्यवस्था करून त्याची जबाबदारी एका पालकावर सोपवली जाते. त्यामुळे शाळेविषयी पालकांमध्ये जागरूकता निर्माण होते. बालवाडीसाठी एखाद्या मंडळाची जागा किंवा सरपंचाचे कार्यालय दिले जाते.
वस्तीतील पालकांचे शिक्षकांच्या शिक्षण पद्धतीवर लक्ष असून ते सतत जागरूक असतात. शिक्षकांच्या सूचना, अडचणी यांचे पालन पालक नेहमी करतात. शिक्षक पालकांना शाळापूर्व तयारीबद्दल मार्गदर्शन करतात.सामान्य ज्ञान आणि स्वयंसहायतेच्या पलीकडे आणखी काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या पाल्याने शिकणं आवश्यक आहे.
- मानसिक आणि सामाजिक विकास
- निरीक्षण क्षमतेचा विकास (ऐकणं आणि पाहणं)
- शरीराची ओळख
- शरीर विकास
- संवाद आणि भाषा कौशल्य
- अंक ओळखणं
- संकल्पना तयार करणं
-
अंकांची ओळख
अंक ओळखणे ही रोजच्या आयुष्यात अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, शाळेत जाऊ लागे पर्यंत तुमच्या मुलाने ती शिकणं गरजेचं आहे, निदान पुढील संकल्पना त्याला माहीत आसायला हव्यात.आकडेमोड : २० पर्यंत आकडे त्याला बोलता आले पाहिजेत. पहिला, दुसरा, तिसरा असे क्रमांक त्याला कळले पाहिजेत.- लहान मोठया संख्या त्याला कळल्या पाहिजेत.
- संख्या आणि वस्तू यांचा मेळ घालता आला पाहिजे. उदा. ५ या संख्येपुढे ५ मणी त्याला ठेवता आल्या पाहिजेत,
- आकारानुसार एखादी ओळ पूर्ण करता आली पाहिजे,
वर्गीकरण : समान आणि विषम या दोन निकषांवर त्याला वर्गीकरण जमले पाहिजे, तुम्ही अशी मदत करू शकाल :- त्यांच्या सोबत मोजणी करा. उदा. शेतात किती झाडं आहेत? किती मुलं खेळत आहेत? किती काटे चमचे टेबलावर आहेत?
- १ ते २० (किंवा ५० किंवा १००) आकडे मोजा आणि त्यांच्या या मोजण्याचं कौतुक आणि आश्चर्य व्यक्त करा.
- लिहिलेले आकडे ओळखायला सांगा.
- समोर ठेवलेल्या वस्तूंमध्ये पहिली, दुसरी, पाचवी, आठवी वस्तू कोणती ते विचारा.
- कपडे घडया करून ठेवताना मॅचिंग मोजे काढून एकूण किती जोडया मोजे आहेत ते त्याला विचारा.
- बेरजा आणि वजाबाक्या शिकवा. उदा. एक बिस्कीट असताना आणखी एक द्या, आता किती बिस्कीटं झाली? ५ चॉकलेटस असताना ३ खाल्ली, आता किती उरली? असे प्रश्न विचारा.
- मण्यांची एखादी माळ किंवा चित्र तयार करा आणि तशीच माळ किंवा चित्र मुलास तयार करायला सांगा.
निरीक्षण क्षमतेचा विकास
पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींचा अर्थ तुमच्या मुलाचा मेंदू किती चांगल्या प्रकारे लावतो यालाच निरीक्षण क्षमतेचा विकास म्हणतात.ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी- तुम्ही तुमच्या मुलासोबत वेळ घालवताना डोळे बंद करा आणि आजूबाजूचे आवाज कोण जास्त ओळखतो हा खेळ खेळा.
- बालगीतं स्वत: म्हणून त्यानाही गायला शिकवा.
- वस्तू मोजण्याचा खेळ खेळा. (हे अंकांसाठी आवश्यक आहे.)
- यमक जुळवण्याचा खेळ खेळा. उदा. कॅट – बॅट, हाऊस – माउस. तसेच मराठी शब्द- घर-वर, पत्र-छत्र. इत्यादी.
बघण्याची क्षमता वाढवण्यासाठी- एखादं चित्र बघून त्यातल्या गोष्टी ओळखणे.
- स्मरणशक्तीचे खेळ खेळणे. यात त्याच्यासमोर काही वस्तू ठेउन त्या मुलाला पाहायला सांगा. त्यातील एकेक वस्तू समोर ठेउन ती कोणती वस्तू आहे असे त्याला विचारा. जास्तीत जास्त किती वस्तू तो सांगतो हे पहा.
- कोडी तयार करा आणि सोडवायला सांगा.
- मॅचिंग चपला, सॉक्स निवडणे, वस्तू आपापल्या जागेवर ठेवणे अशा कामाच्या जोडया लावा. या जोडया बटन, खडे, पैसे यांच्याही तुम्ही लाऊ शकता. बॉल किंवा थाळी फेकणे आणि पकडणे या क्रियाही मुलांना मजेशीर वाटतात आणि त्यातून मुलांना शिकताही येतं.
भाषा आणि संवाद कौशल्य
तुमचा पाल्य हा एक तर बडबडया किंवा शांत राहून विचार करणारा असू शकेल, संवाद साधण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, त्यांच्या भाषेचा विकास आपण असा साधू शकाल :- त्यांच्याशी बोबडया भाषेत बोलणं टाळा. बोलताना स्पष्ट शब्दोच्चार, शुद्ध नावांचा उच्चार करा.
- त्यांनी दिवसभरात काय काय केलं हे त्यांच्या कडून बोलून घ्या. ते लक्षपुर्वक ऐका.
- बालगीतं तुम्ही त्यांच्या सोबतच म्हणा.
- एखादी गोष्ट तुम्ही त्यांना सांगा, एखादी त्यांच्याकडून ऐकून घ्या. झाड छोटं आहे की उंच ? उशी मऊ आहे की कडक ? पाणी गरम आहे की थंड असे प्रश्न त्यांना विचारा.
- एखादी कथा त्यांना सांगा मात्र तिचा शेवट काय असेल हे त्यांनाच विचारून तसं चित्र उभं करायला सांगा.
मानसिक आणि सामाजिक विकास
आपल्या मुलाला स्वत:च्या आणि इतरांच्या भावना जपायला शिकवा. काही महत्त्वाच्या टिप्स पुढीलप्रमाणेतुमच्या मुलाला स्वतंत्रपणे काम करू द्या. शाळेची सुरुवात होईपर्यंत त्याला कपडे निवडणे, कपडे घालणे, दात घासणे, बुट घालणे, टाय लावणे या गोष्टी जमायला हव्यात. त्यांची कामं तुम्ही स्वत: करण्यासाठी धडपडू नका. ते सोपं वाटत असेल तरीही नको. त्याचं ऐका. त्यांच्या आवडीच्या गोष्टी समजून घ्या. विविध गोष्टीवर त्यांचीही मतं घ्या. रात्रीच्या जेवणासाठी दोन पर्याय ठेवा. आणि त्यातला एक त्यांना निवडू द्या. यावरून त्यांच्या शब्दालाही किंमत, आदर असल्याचं त्यांना जाणवेल. त्यांच्या कृतीसाठी त्यांनाच जबाबदार धरा.
जेंव्हा तुमचं मुल काही चुकीचं वागेल तेंव्हा त्यांना स्वत:लाच त्याची कबुली देता आली पाहिजे. पण अशा प्रकारच्या चुका तुम्हाला किंवा त्यांनाही आवडत नाहीत हे त्यांच्या मनात रुजवा. उदा. ‘तू फार खोडकर मुलगी आहेस’ असं म्हणण्या ऐवजी ‘तू जे केलंस ते अत्यंत खोडकर होतं’ असं म्हणा. मुलाच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करा. त्याने काढलेली चित्रे आणि तयार केलेल्या वस्तू घरात लावा. त्याने खेळात किंवा अन्य कोणत्याही केलेल्या उत्तम कामगिरीविषयी नातेवाईकांना, मित्रांना फोन करून कळवा. चांगल्या कामामुळे किंवा तशा प्रयत्नामुळे आपले पालक खुश होत असल्याचं त्यांचा लक्षात येऊ द्या.- बघण्या, ऐकण्याची क्षमता
- शरीराची माहिती
- शारीरिक विकास
- संवाद आणि भाषा कौशल्य
- अंक ओळखणे
- संकल्पना तयार करणे.
शरीराची ओळख
आपल्या शरीराची माहिती आणि त्याची हालचाल कशी असते हे प्रत्येक मुलाला माहित असणं आवश्यक आहे.- तुम्ही तुमच्या मुलाला त्याच्या शरीराचं चित्र तयार करायला पुढीलप्रमाणे मदत करू शकता.
- आरशासमोर उभं राहून ‘हा आईचा कोपर, हा सोनूचा कोपर ’ किंवा ‘हा बाबांचा गुडघा, हा छकुलीचा गुडघा’ अशा प्रकारे शरीराच्या अवयवांची माहिती देऊ शकता.
- त्याचे डोळे बंद करून त्याच्या अवयवांना स्पर्श करून तुम्ही कुठे बोट ठेवलं आहे ते ओळखायला सांगा.
- मुलाला स्वत:चं किंवा इतरांचं चित्र काढायला सांगा. आधी त्याच्या चित्राचं कौतुक करा. मग हळूच ‘याला नाक असतं तर श्वास घ्यायला सोपं झालं असतं नाही का ?’ किंवा ‘याला पाय असते तर हा चालू शकला असता असं नाही वाटत? अशा प्रश्नांनी त्याला थोडं चुचकारावं.
- आरशाचा खेळ : आरशात प्रतिबिंब दिसतं तसं तुम्ही आणि मुल समोरासमोर उभे रहा. आणि तुम्ही हात पाय हलवले की त्याला आरशाप्रमाणे प्रतिसाद द्यायला सांगा. अशा प्रकारे सर्व अवयवांचे वेगवेगळे प्रकार करा, याने तुमच्या मुलाला स्वत:च्या शरीराची चांगली ओळख होईल.
- याचप्रमाणे शरीराच्या हवेतल्या हालचाली कशा असतात ते ही आपण शिकवू शकाल. त्याला पुढे, मागे, आजूबाजूला चालण्यास, उडया मारण्यास सांगा. वर, खाली, बाजूला या गोष्टी शिकवण्यासाठी तुम्ही टेबलावरच्या काटा चमच्याचा वापर करू शकता. हे काटे चमचे सरळ रेषेत लावले तर त्यांना दिशाही दाखवता येतील.
शारीरिक विकास
हा त्याला वर्गात नीट बसण्यासाठी, अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अगदी हातात पेन्सिल पकडण्यासाठीही आवश्यक आहे,- मुलाचा शरीरातील स्नायूंचे नियंत्रण (ग्रॉस मोटर स्कील) : मोठया अवयवांचा वापर आणि हालचाली : शरीरातील मोठया स्नायुंकडून नियंत्रित होणा-या हालचाली या मोठया हालचाली असतात. यामध्ये चालणे, धावणे, उडया मारणे या हालचाली येतात, या मोठया हालचालींचा विकास करण्यास आपण पुढील प्रमाणे शिकवू शकता.
- मुलासोबत खेळा. बॉल किंवा थाळी फेकण्या आणि झेलण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. आधाराशिवाय पायाच्या अंगठयावर उभं राहून त्यांना समतोल साधायला शिकवा. कमी उंचीच्या भिंतीवरून किंवा कठडयावरून किंवा विटांच्या थरावरून त्यांना चालण्यास सांगा. असं सरळ चालणं त्याला जमलं की मागे चालायला सांगा. त्यानंतर चालताना बॉल झेलायला सांगा. मुलाबरोबर या गोष्टी उडया मारताना, दोरीच्या उडया मारताना, गोल फिरतानाही करू शकता.
- लहान अवयवांच्या हालचाली (फाईन मोटर स्कील) : या हालचाली लहान स्नायुनी नियंत्रित होतात. यात पेन्सिल सारखी लहान वस्तू पकडण्याच्या क्रियेचा समावेश होतो, या हालचालींच्या विकासाकरता पुढील प्रयत्न करू शकता,
- खेळण्याच्या मातीने लहान गोळे तयार करून ते अंगठा आणि इतर बोटांनी पकडायला सांगा. लहान कात्रीने वेगवेगळ्या आकारातील चित्रे कापायला सांगा. वर्तमान पत्रांचे किंवा टिश्यू पेपरचे तुकडे कापून किंवा फाडून त्याचे गोळे तयार करा, मणी किंवा स्ट्रॉची माळ धाग्यात ओवायला सांगा.
- चित्र काढा आणि ती रंगवा.
संकल्पना निर्मिती
शाळेत जाण्याआधी तुमच्या मुलास/मुलीस काही संकल्पना माहीत असणं आवश्यक आहे. त्यातील मुख्य पाच पुढीलप्रमाणे :रंगलाल, पिवळा, निळा हे प्राथमिक रंग, नारंगी, हिरवा, जांभळा हे दुय्यम रंग मुलास ओळखता येऊ दे. दुय्यम रंग हे प्राथमिक रंगांच्या मिश्रणातून तयार होतात हे त्याला कळू दे. उदा. लाल+पिवळा= नारिंगी, पिवळा+निळा = हिरवा, लाल+निळा = जांभळा.आकारगोल, चौकोन, त्रिकोण, चौरस, पंचकोन, अंडाकृती, अर्धगोल, अष्टकोन, चांदणी हे आकार मुलाला ओळखता येऊ दे. रस्त्याने चालताना आकरांची माहिती आपण देऊ शकता.लहान - मोठीलहान, मोठा, खूप लहान, खूप मोठा असे आकार त्यांना कळू दे. घरात सगळ्यात उंच आणि सगळ्यात बुटकं कोण आहे ते विचारा. चित्र बघताना लहान प्राणी मोठा प्राणी, लहान शेपटी, मोठी शेपटी कोणाची असे प्रश्न त्यांना विचारा.पोत (प्रकार किंवा गुणधर्म) ओळखणेएखाद्या वस्तूचा पोत कसा असतो आणि तो कसा ओळखायचा हे त्याला कळू दे. झाडाचं खोड मऊ की कडक ? दगड आणि कापड यात मऊ काय ? असे अनेक प्रश्न त्यांना विचारा.वेळवेळ सांगणं मुलासाठी कठीण असतं. पण तुम्ही वेळ सांगून मुलाला घडयाळ दाखवा. झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ त्यांना सांगा. दुपारचं जेवण १ वाजता, रात्रीचं ९ वाजता अशा वेळा त्यांना सांगा. आज, काल, उद्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ, दिवस, आठवडा, महिना, वर्ष हे ही त्यांना शिकवा. अशा गोष्टी शिकवण्यासाठी बालगीतांचा किंवा बडबडगीतांचा आधार घेता येईल.
No comments:
Post a Comment