Monday, 2 December 2013

अभ्यास कसा करावा

अभ्यास कसा करावा

शैक्षणिक यश मिळविण्यासाठी अभ्यास किती वेळ करावा यापेक्षा अभ्यास कसा करावा हे अधिक महत्वाचे आहे. अभ्यासाचा मानसिक ताण निर्माण होऊ नये तसेच शिकलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहाव्यात यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.अभ्यासाच्या चुकीच्या पद्धतीमुळे देखील अपयश येत असते. दिवसरात्र अभ्यास करणे महत्वाचे नसून एकाग्र चित्ताने आणि निग्रहाने अभ्यास करणे गरजेचे असते. 
  • संदर्भयुक्त अभ्यास : केवळ पाठांतरावर भर देण्याऐवजी ‘तपशीलवार अभ्यासा’(Elaborative learning)ची सवय लावून घ्यावी. त्यासाठी एखाद्या शब्दाचे विविध अर्थ आणि उपयोग शब्दसंग्रहातून शोधून काढणे, पाठ्यपुस्तकातील एखाद्या गोष्टीचे इतरत्र संदर्भ शोधणे, गणित, विज्ञान अशा विषयातील तत्वे प्रत्यक्ष व्यवहारातील गोष्टींमध्ये शोधणे अशा प्रकारच्या कृती करता येतील. त्यामुळे अभ्यासातील रटाळपणा कमी होतो आणि अभ्यासाचा कंटाळा येत नाही. शिवाय एकदा शिकलेल्या गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात. 
  • अभ्यास चर्चा ग्रुप : अभ्यास शक्यतो एकटेपणी न करता समवयस्क मित्रांसोबत करावा. अभ्यासाबद्दल मित्रांसोबत चर्चा करावी. चर्चा हा ‘तपशीलवार अभ्यासा’चा अजून एक प्रभावी मार्ग आहे. इतरांशी चर्चा करताना किंवा त्यावर इतरांची मते ऐकताना एकदा वाचलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती होते. त्यामुळे गोष्टी सहजपणे स्मरणात राहतात. 
  • क्षणभर विश्रांती : शिकण्याची प्रक्रिया ही मुख्यतः मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मेंदूचे स्वास्थ्य अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी पुरेशी झोप घेणे, मानसिक ताणतणाव टाळणे, मोकळ्या वेळात खेळ खेळणे, आपले छंद जोपासणे आवश्यक आहे.    
  • ताजेपणा आणि प्रसन्नता : शक्यतो सकाळच्या प्रसन्न वातावरणात अभ्यास करावा. सकाळच्या वेळेत मेंदू सर्वाधिक कार्यक्षमपणे काम करतो. त्यामुळे सकाळच्या वेळेत अभ्यास करणे लाभदायक ठरते. 
  • आनंददायी व ज्ञानदायी अभ्यास : अभ्यासाकडे केवळ शालेय परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने न पाहता, अभ्यास ही ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवावे. कारण अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदल्यामुळे अभ्यासाची पद्धतही बदलते आणि भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी त्याचा फायदा होतो.

No comments:

Post a Comment