Monday, 2 December 2013

'गुरुकुल' शिक्षण पद्धती

'गुरुकुल' शिक्षण पद्धती

प्राचीन काळात ‘गुरुकुल’ शिक्षण पद्धती होती. गुरुकुल शिक्षण पद्धतीत शिक्षण पूर्ण होईपर्यंत विध्यार्थ्यांना गुरूंच्या आश्रमातच राहावे लागत असे. आश्रमात राहत असतांना विध्यार्थ्यांना स्वतःची, आश्रमाची आणि गुरूंची सर्व कामे करावी लागत असत. यामुळे ते कामसू आणि स्वावलंबी बनत असत. याठिकाणी सर्व विध्यार्थी सोबत राहत त्यांच्यात जातीपातीचा, श्रीमंती-गरिबीचा कुठलाच भेद नसे. भारतात वैदिक काळापासून गुरुकुल अस्तित्वात होते. गुरु द्रोणाचार्य-अर्जुन, द्रोणाचार्य-एकलव्य, सांदिपनी-श्रीकृष्ण यांपासुन ते निवृत्ती महाराज-ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत गुरु शिष्यांची फार मोठी परंपरा या देशाला लाभलेली आहे. ही एक निस्वार्थ शिक्षण पद्धती होती. गुरुकुल हे पूर्णपणे लोकांनी आणि राजाने दिलेल्या देणगीवर चालत असत. यात गुरु कुठलीच अपेक्षा न ठेवता शिष्यांना ज्ञानदानाचे महान कार्य करायचे. ते शिष्यांकडून कोणतीच दक्षिणाही मागत नसत शिष्याला वाटले तर तो त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला जे द्यायचे असेल ते द्यायचा. परंतु शिष्य गुरुंप्रती आजन्म कृतज्ञ  मात्र असायचा. 
शिक्षण: या पद्धतीत विध्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण दिले जात. यात अनेक विद्या, मंत्र-तंत्र, अस्त्र-शस्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, योगशास्त्र इत्यादी अनेक गोष्टींचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जात असे. शस्त्रांमध्ये त्यावेळी धनुष्यबाण, भाला, गदा, तलवार इत्यादी चालवण्याचे प्रशिक्षण येथे दिले जायचे तर योगशास्त्रात ध्यानधारणा, योगासने, हटयोग, राजयोग, यांचे प्रशिक्षण दिले जात असे. असे परिपूर्ण शिक्षण देण्याचा उद्देश हाच कि गुरुकुल मधून शिकून बाहेर पडलेला विध्यार्थी एक पूर्ण पुरुष असावा. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अष्टपैलू विकास व्हावा.  
हे एक महान शिक्षण पद्धती होती. आजही बऱ्याच ठिकाणी गुरुकुल शिक्षण पद्धती दिसून येते परंतु आजकाल काळाच्या ओघात तिच्यात बरेच बदल झाले आहेत. शिक्षणाचे विषय बरेच मर्यादित आहेत आणि प्रामुख्याने पुस्तकी ज्ञानावरच भर आहे. गुरुकुलाचे नियमही आधीसारखे कठोर राहिलेले नाहीत. या महान शिक्षण पद्धतीचे अनेक फायदे आहेत त्यांचा थोडक्यात विचार करू. 
महत्त्व: 
नियमांनी बांधलेले जीवन: गुरुकुल शिक्षण पद्धतीचे जीवन हे नियमांनी बांधलेले असावे लागते. सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे. रोज स्नान करणे, ध्यान-पूजापाठ करणे, अभ्यास करणे या सर्व गोष्ठी गुरूंच्या देखरेखीखाली कराव्याच लागत असल्यामुळे विध्यार्थ्यांना या नियमबद्ध जीवनाची सवय लागत असे. 
स्वावलंबन: शिष्यांना स्वतःची सर्व कामे स्वतःच करावी लागत असे त्यामुळे ते स्वावलंबी बनत. परावलंबी व्यक्ती स्वप्नातही सुखी होऊ शकत नाही असे रामायणात म्हटले आहे. स्वावलंबन हा खरोखरच एक महान गुण आहे. महात्मा गांधीजी स्वावलंबनाला खूप महत्त्व द्यायचे.  
कष्टाची सवय: आश्रमात झाडलोट करणे, स्वयंपाकात मदत करणे, जंगलातून लाकडे आणणे, पाणी भरणे इत्यादी आश्रमात पडेल ते काम करण्याच्या सवयीमुळे मुले कामसू बनत. ते कष्टांना कधीही भीत नसत. रोजच्या भरपूर कष्टांमुळे त्यांचे शरीर निरोगी आणि सुदृढ बनत. ते शरीर त्यांना आयुष्यभर आपल्या कर्तव्याच्या पालनात मदत करीत असे. 
ब्रह्मचर्यपालन: आश्रमात राहत असतांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत सर्व शिष्यांना ब्रह्मचर्य पालन करावे लागत असे. ब्रह्मचर्यपालनामुळे मुले चारित्र्यवान आणि संयमी बनत. अशाप्रकारे एका चारित्र्यसंपन्न समाजाची निर्मिती करण्याचे कामही गुरुकुल करीत असे. 
तर अशी ही ‘गुरुकुल’ शिक्षण पद्धती सर्वांगाने सुंदर आणि महान होती. आज ती पूर्वीसारखी राहिली नाही तरीही या पद्धतीचे काही फायदे आजच्या गुरुकुल पद्धतीतही होताना दिसून येतात. गुरुकुल मध्ये राहिलेली मुले थोड्याफार प्रमाणात तरी स्वावलंबी असतात. ती घरापासून दूर राहू शकतात. सकाळी लवकर उठणे, रोज स्नान करणे इत्यादी सारख्या काही चांगल्या सवयीही त्यांना लागतात. 

No comments:

Post a Comment