Monday, 2 December 2013

उत्तरपत्रिका (पेपर) लिहीण्याची कला

उत्तरपत्रिका (पेपर) लिहीण्याची कला

परीक्षा म्हणजे आपण जे काही शिकलो, ते उत्तरपत्रिकेत लिहिण्याची कसोटी. तुम्ही जो काही अभ्यास केला आहे, तो सुसंगत पद्धतीने मांडण्याची कलाही तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. पण सुसंगत लिहायचे म्हणजे नेमके काय करायचे याची थोडी सविस्तर माहिती घेऊया. 
• लेखन कौशल्याची तत्त्वे 
सखोल अभ्यास – परीक्षेसाठी असलेला अभ्यास संपूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे पेपर लिहिताना अचूक संदर्भ देता येतात. दहावी, बारावी, पदवी या प्रत्येक टप्प्यावरील अभ्यासक्रमामध्ये फरक असतो. दरवेळी काठिण्यपातळीमध्येही वाढ होते. आपले ज्ञान वाढावे यादृष्टीने अभ्यासक्रमाची रचना केलेली असते. त्यामुळे उत्तरे लिहीतानाही सखोल अभ्यास करून चांगले सादरीकरण करण्याचा प्रयत्न करा. परीक्षेतील प्रश्नाचे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह प्रकारचे असू शकते. त्यानुसार विषय समजून घेऊन सविस्तर अभ्यास करणे गरजेचा आहे.
• सादरीकरण उत्तम हवे 
एखादे उत्तर विस्तृत लिहिले म्हणजे ते चांगले किंवा खूप मार्क मिळतात असे नाही. उत्तर लिहिताना आपल्याला हा विषय समजला आहे, अशा प्रकारे उत्तर लिहिल्यास जास्त फायदा होतो. उत्तरपत्रिका लिहिताना शक्यतो खोडाखोड करू नये. प्रश्नांच्या क्रमाने लिहीलेली उत्तरे, परिच्छेद, दोन शब्दांमध्ये योग्य अंतर, सुवाच्य अक्षर, रेखीव आकृत्या, आवश्यक तेथे उपनावे, सूत्र किंवा नियम या सगळ्या गोष्टींमुळे उत्तरपत्रिका अधिक चांगली होते.  
• मानसिकतेमध्ये बदल 
पदवी पातळीवर केवळ गुण (मार्क्स) मिळविणे इतकेच ध्येय ठेवून चालत नाही. अभ्यासासाठी असलेला अभ्यास समजून घेऊऩ शिकणे पुढील करिअरच्या दृष्टीने आवश्यक असते. त्यादृष्टीने उत्तरांचे लिखाण हवे. तुमच्यातला आत्मविश्वास तुमच्या उत्तरांमधून जाणवायला हवा. त्यातून तुम्हाला अभ्यास किती समजला आहे हे परीक्षकांच्या लक्षात येते. 
परीक्षा केवळ तुमच्या ज्ञानाची कसोटी असते असे नाही, तर तुमचा दृष्टीकोनही त्यातून तपासला जातो. अभ्यास, त्यातून फापटपसारा न करता लिहिलेली नेमकी उत्तरे, सखोल अभ्यास दर्शविणारे मुद्दे या गोष्टींचे भान पेपर लिहिताना सोडता कामा नये. 
प्रश्नपत्रिका सोडवताना मुद्देसूद आणि व्यवस्थित सोडवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.  

No comments:

Post a Comment