‘झोप’ या गोष्टीकडे नकारात्मकपणे पाहण्याऐवजी झोप हीसुद्धा आपली एक महत्वाची गरज आहे हे लक्षात ठेवायला हवे. झोपेबद्दल मुख्यतः खूप झोप येणे, झोप न येणे आणि अनियमितपणा अशा तक्रारी केल्या जातात.वस्तुतः सामान्य शारिरीक आणि मानसिक परिस्थितीत झोप शरीराला आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक झोपेची शरीराकडून मागणी केली जात नाही. खूप झोप येणे किंवा झोप न येणे अशा तक्रारींमागे काही महत्वाची मानसिक कारणे आहेत. मुळात साधारणतः दिवसाला आठ तास (कुमारवयीन मुलांसाठी हे प्रमान नऊ ते दहा तास आणि अल्पवयीन मुलांसाठी यापेक्षाही अधिक) झोपेची गरज असते,(यात व्यक्तीनुसार फरक पडू शकतो)हे लक्षात घेतले जात नाही.
याशिवाय झोपेच्या अनियमित वेळा, चुकीच्या वेळा (रात्री जागणे व दिवसा झोप घेणे), झोपेतून उठल्यांनंतर पुढे येवू घातलेल्या कामांची, अभ्यासाची भीती, कंटाळा किंवा त्या कामात रस नसणे अशा कारणांनी झोपेच्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे या गोष्टींमध्ये शिस्त पाळली तरअतिझोपेची तक्रारच करावी लागणार नाही. अभ्यासाच्या वेळापत्रकात सर्व विषयांच्या वेळेचे नियोजन करताना झोपेला मात्र पुरेसा वेळ देण्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण झोपेमुळे शरीराला आलेला थकवा कमी होतो. शरीराच्या विविध भागांची झालेली झीज मुख्यतः झोपेच्या काळात भरून काढली जाते.तसेच शारिरीक आणि मानसिक वाढ तसेच अन्य महत्वाच्या प्रक्रियांशी निगडीत रसायने याच काळात स्त्रवली जातात. त्यासाठी शरीराला झोप अत्यंत गरजेची असते.
पुरेशा विश्रांतीनंतर शरीर पुरेशा ऊर्जेसह पुन्हा कामाला लागू शकते. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अभ्यासात लक्ष न लागणे, चिडचिड होणे, पाठ केलेले लक्षात न राहणे, सतत थकवा जाणवणे, उत्साह कमी होणे असे परिणाम घडून येऊ शकतात. झोपेला महत्व न दिल्यामुळे अभ्यासाचे तास तर वाढतात, मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुले आणि पालकांनी अभ्यासाचे नियोजन करताना, अभ्यासाइतकीच झोपही महत्वाची आहे, याचे भान ठेवायला हवे.
No comments:
Post a Comment