नाविन्याचा शोध
नवीन गोष्टींचा शोध घेण्याची क्षमता माणसात पूर्वीपासून चालत आलेली आहे. माणसाने शेतीचा शोध लावला, चाकाचा शोध लावला आणि त्यातून स्वतःचा, कुटुंबाचा आणि आपल्या समाजाचा विकास केला. नवीन गोष्टींच्या शोधामुळे माणसाला त्याचे जगणे आनंदी, सोपे, कमी कष्टाचे करता आले. आजारांवर उपचार करता आले. नवीन गोष्टींचा शोध घेण्याची सवय ही आपल्याला कायम फायद्याची ठरत आलेली आहे. काही लोकांनी नव्या देशांचे शोध लावले यामुळे खूप नव्या गोष्टींची माणसाला माहिती झाली. त्यातून अनेक गोष्टींची देवाणघेवाण सुरु झाली आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा झाला.
आपल्याला यशस्वी होण्यासाठी जसे कष्ट करावे लागतात त्याचप्रमाणे नवीन गोष्टी शिकल्याने, त्यांचा शोध घेतल्याने आपल्याला आपला विकास करता येतो. नवीन माहिती मिळवल्याने आपण या काळात चांगल्या प्रकारे जगू शकतो. आपण मोबाईल वापरायला शिकलो तर आपली बरीच कामे जाग्यावरून होतात. आपले हेलपाटे वाचतात. नवीन गोष्टींमुळे आनंद सुद्धा होतो. शिकण्याची पण मजा असते. नवीन गोष्टी शिकायची मनाची तयारी हवी. त्यामुळे नवनवीन खूप काही समजते, करता येते. नवीन गोष्टींची माहिती घेतल्यामुळे आपल्याला स्वतःचा विचार करायची सवय लागते. नव्या, तरुण पिढीशी चांगले जमू शकते. उगाचच म्हातारे झाल्यासारखे वाटत नाही उलट जगायला जोम येतो.
लोकमान्य टिळक यांचे उदाहरण खूप बोलके आहे. टिळक जेंव्हा मंडाले येथे सहा वर्षं जन्मठेपेची शिक्षा भोगत होते तेंव्हा त्यांच्या वयाची पन्नाशी उलटली होती. तरीही त्यांनी व्याकरणाची पुस्तके मागवून त्यावरून फ्रेंच व जर्मन भाषांवर प्राविण्य मिळवले होते. याला म्हणतात नवीन गोष्टींचा शोध घेणे. यातून माणूस ज्ञानी तर होतोच पण त्याचबरोबर विचारही व्यापक होतात म्हणून नाविन्याचा शोध घेणे ही आयुष्य सुंदर करणारी गोष्ट आहे.
No comments:
Post a Comment