Showing posts with label SHALA. Show all posts
Showing posts with label SHALA. Show all posts

Monday, 2 December 2013

परीक्षेदरम्यान आरोग्याची काळजी

परीक्षेदरम्यान आरोग्याची काळजी

परीक्षेच्याआधी आपला संपूर्ण अभ्यास झाला असला, तरी मनावर ताण असतोच. या ताणामुळे परीक्षेआधी आजारी पडण्याचा संभव असतो. परीक्षा म्हणजे तुम्ही जे शिकला आहात, ते दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याची संधी. या संधीचा उपयोग उत्तम गुण मिळविण्यासाठी केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. 
परीक्षापूर्व आरोग्याची काळजी कशी घ्यावी? 
परीक्षापूर्व आरोग्याची काळजी संदर्भात बोलताना डॉ. मीनल सोहोनी म्हणाल्या,‘ अभ्यास करूनही तुम्हाला ताण येत असेल, तर त्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. परीक्षा म्हणजे तुम्ही केलेला अभ्यास दाखवून द्यायची संधी असते. असे समजा, की परीक्षा म्हणजे एकशो-केसविंडो असते. मग ती जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे कशी दा्खवता येईल याचा विचार करा. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन या दोन गोष्टींमुळे तुम्ही ताणापासून मुक्त होता.’ 
योग्य आहार – हलका आणि सकस आहार घ्यावा. खूप जास्त किंवा खूप कमी आहार घेऊ नये. परीक्षेच्या कालावधीमध्ये हातगाडीवरील अथवा हॉटेलमधील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे. 
झोप – खूप पहाटे उठणे किंवा खूप उशिरापर्यंत जागणे या दोन्ही गोष्टी टाळाव्यात. सवय नसताना जागरण करणे अथवा खूप लवकर उठणे या दोन्ही गोष्टींमुळे आरोग्य बिघडू शकते. 
अती ताण नकोच – नियमित अभ्यास करूनही काही विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येतोच. या टेन्शनमुळे आपले आरोग्य बिघडणार नाही याची काळजी. तुम्ही जो अभ्यास केला आहे, तो तुम्ही उत्तमपणे लिहू शकाल अशी खात्री बाळगा. 
परीक्षा साहित्य वेळेवर घ्या – परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची खरेदी वेळी चकरा. त्यामुळे आयत्यावेळी धावपळ आणि दमणूक होणार नाही. 
घरचा सपोर्ट हवा– परीक्षेमध्ये अमुक इतके मार्क मिळवच असा दुराग्रह पालकांनी ठेवता कामा नये. परीक्षा म्हणजे सर्वस्व नाही हे लक्षात घ्या. पालकांनी मुलांच्या मेहनतीचे कौतुक केले पाहिजे.या गोष्टींचा मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो.

नेहमीपेक्षा वेगळा विचार

नेहमीपेक्षा वेगळा विचार

आपण कसा विचार करतो, त्यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं. आपल्या मनात जे विचार येत असतात त्याचप्रमाणे आपले आयुष्य घडत असते. आपण जर उदात्त व सात्विक विचार बाळगला तर आपला चेहराही सात्विक दिसतो. जर आपल्याला आयुष्यात चांगले जीवन जगायचे असेल, आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणावयाचा असेल तर आपल्याला नेहमीपेक्षा वेगळा करणे अत्यंत गरजेचे आहे.
 काय होतं नेमकं नेहमीपेक्षा वेगळा विचार केल्यावर तर.........
•  आपल्या समस्या, प्रश्न आपण सहजपणे सोडवू शकतो.
•  जीवनाकडे सकारात्मकपणे बघता येते.
•  आपला जीवनविषय दृष्टिकोन व्यापक बनण्यास मदत होते.
•  इतरांकडून मदतीची अपेक्षा ठेवण्यापेक्षा तुम्हीच इतरांना मदत करायला पुढे धावता.
•  एखाद्या प्रश्नाकडे विविध अंगांनी बघता येणे सहज शक्य होते.
•  मन आनंदी राहते.
•  आपल्या जीवनात परिवर्तन होण्यास मदत होते. 
•  आपल्या स्वभावामध्येही बदल होण्यास मदत होते.
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला खूप काम करावे लागते, या सर्व धावपळीत मानसिक ताणतणावालाही आपण सामोरे जात असतो. अशा वेळी आपण चिंता करत बसण्यापेक्षा जर दररोजच्या पेक्षा वेगळा विचार केला तर आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणणे सहज शक्य होते. याबरोबरच जीवनात आपण अनेक गोष्टींचा सामना सहजपणे करू शकतो. यासाठी एक उदाहरण आपण आता पाहू. 
बर्नर हा तरुण एका फोटोग्राफरकडे काम करीत होता. त्याच्या स्टुडिओत एक तरुण एकदा एक खगोल शास्त्रावरील पुस्तक विसरला. हे पुस्तक बर्नर घरी घेवून गेला आणि रात्रभर जागुन त्याने ते पुस्तक वाचून काढले. त्या पुस्तकातून बर्नरला स्फूर्ती मिळाली आणि त्याने एक चार इंची दुर्बिण खरेदी केली. त्याच चार इंची दुर्बिणीने तो आकाश निरीक्षण करू लागला. आकाश निरीक्षणाचा क्रम त्याने रोज रात्री चालू ठेवला. त्यामुळे त्याचा अभ्यास वाढत गेला. त्याला खगोलशास्त्रातील थक्क करणारी माहिती मिळाल्यावर त्याच्या आश्चर्याला सीमाचा राहिली नाही. आता त्याने थोडी मोठी दुर्बिण खरेदी केली आणि आकाशाचा त्याचा अभ्यास रोज वाढू लागला. लवकरच त्याच्या मेहनतीला फळ मिळाले. त्याला समजलेली आकाशातील अनेक रहस्ये त्याने जगासमोर मांडली हे सर्व यश बर्नरला तेथे विसरलेल्या पुस्तकातून लाभले. बर्नरला संधी एका पुस्तकातून मिळाली एका पुस्तकाच्या रुपाने बर्नरसमोर संधी चालून आली होती. त्याचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. खरोखर त्यावेळी बर्नरने वेगळा विचार केला नसता तर तो खगोलशास्त्राचा अभ्यासक होऊ शकला नसता. परंतु त्याने नेहमीपेक्षा वेगळा विचार केला व आयुष्यात यशस्वी झाला. आपल्यालाही जर काही मिळवायचे असेल तर अनेक मार्ग खुले असतात फक्त त्या मार्गांचा शोध घेण्यासाठी आपण नेहमीपेक्षा वेगळा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. 

गृहपाठात मदत

शाळेत चांगला अभ्यास होण्यासाठी पालकांनी त्याच्या अभ्यासात आणि त्याच्या शालेय जीवनात रस घेतला पाहिजे, या भागात आपण पाहू की गृहपाठासाठी खास जागा कशी करता येईल. गृहपाठाचे/अभ्यासाचे मार्ग, त्यातील मजा, सकारात्मक दृष्टीकोन या विषयी या विभागात पाहू.
  • गृहपाठासाठी उत्तम जागा : घरामधील शांत जागा निवडा जिथे तुमचा पाल्य चांगल्याप्रकारे अभ्यास करू शकेल. ती जागा केवळ त्याच्या अभ्यासाकरीताच असेल. 
  • सकारात्मक दृष्टीकोन : पालकांनी शाळा आणि गृहपाठाविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हवा. तुमच्या मुलाच्या यशासाठी आवश्यक असलेले सल्लेही आपल्या हितचिंतकांकडून घ्या.
  • गृहपाठात मदत : गृहपाठ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, 
  • इंटरनेटचा स्त्रोत (मार्ग) : पालकांनी मुलांना गृहपाठात कशी मदत करावी याची माहिती पुस्तकं किंवा इतर माध्यमांबरोबर, इंटरनेटवरही मिळू शकते.

गृहपाठात मदत करण्यासाठी

पालक म्हणून आपल्या पाल्याच्या अभ्यासात लक्ष घालणं अत्यंत महत्त्वाचं असतं. यामध्येच आपल्या मुलाचा अभ्यास आणि त्याला दिलेले प्रकल्प पूर्ण करून घेणं या गोष्टी येतात. तुम्हाला जरी इंग्रजी बोलता येत नसेल किंवा कळत नसेल. किंवा इतर कोणताही विषय समजत नसेल तरीही तुम्ही तुमच्या पाल्याला मदत करू शकता. खालील लिंकवर एकदा क्लिक करा. 
  • गृहपाठाच्या सामान्य टिप्स : तुमच्या मुलाचा अभ्यास पूर्ण करून घेण्यासाठी सहा टिप्स पहा.
  • भाषा आणि कलेमध्ये सहाय्य : चांगलं वाचन करून उत्तम लेखक होण्यासाठी तुमच्या मुलाला प्रोत्साहन द्या. 
  • गणितामध्ये सहाय्य : गणित हा विषय समजून घेऊन त्याच्यावर प्रेम करायला शिकवा. 
  • विज्ञानात सहाय्य : विज्ञानातील प्रकल्पांसाठी नव्या कल्पना राबवा. काही गमतीशीर गोष्टींचा अवलंब करून विज्ञान हा विषय त्याच्यासाठी सोपा करा. 
  • समाजशास्त्र सहाय्य : तुमच्या मुलाला जगातील इतर भाषा आणि संस्कृतींची ओळख करून द्या.  

गृह्पाठासाठी चांगली जागा तयार करा.

घरातील शांत जागा, एकचएक ठराविक वेळ अभ्यासासाठी निवडण्यामुळे मुलं त्यांना दिलेला गृहपाठ योग्य त-हेने पूर्ण करू शकतील. अशी जागा पालक आणि मुलांना एकत्र काम करायला मदत करेल. 
या काही टिप्स :
  • शांत जागा आणि वेळ निवडा. उदा. टी.व्ही., रेडियो, व्हिडियो गेम्स इ. चा आवाज येणार नाही अशी जागा किंवा ज्या वेळेत हे सर्व बंद असेल अशी वेळ निवडा. 
  • योग्य जागा निवडा : अभ्यासासाठी स्वतंत्र सोय नसेल तर बेडरूममधील टेबल उत्तम राहील, पण स्वयंपाक घरातील टेबल किंवा बैठकीच्या खोलीतील टेबल केंव्हाही उत्तमच राहील.
  • योग्य आणि आवश्यक प्रकाश खिडकीतून किंवा दिव्यातून मिळू शकेल अशी सोय करा. 
  • शाळेच्या आवश्यक वस्तू उदा. कंपास, पेन्सिल, रबर यांचा साठा करून ठेवावा. 
  • पुस्तकांसाठी शेल्फ बनवा. त्यावर शाळेचे प्रकल्प, गोष्टींची पुस्तकं, डिक्शनरी अशा त्याच्या वस्तू पद्धतशीरपणे मांडून ठेवाव्यात.
  • अभ्यास करण्याची ती जागा पेन्सिल होल्डर, आवडते फोटो, चित्र, छोटी झाडं, फुलं यांनी सजवा. त्यामुळे तिथलं वातावरण प्रसन्न राहील. 

सकारात्मक दृष्टीकोन

शाळेत चांगला अभ्यास करण्यासाठी आपल्या मुलाची शाळा आणि त्याचा अभ्यास हा त्याच्यासाठी आणि कुटुंबियांसाठी आवश्यक गोष्टी आहेत हे त्याला कळू दे. आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या अशा :
  • तुम्ही तुमच्या मुलाचे पहिले आणि महत्त्वाचे शिक्षक आहात, इतर कोणापेक्षाही अधिक चांगल्याप्रकारे तुम्ही तुमच्या मुलाला ओळखता. तुम्हीच त्याची उत्तम काळजी घेऊ शकता. त्याच्या शिक्षणाच्या प्रत्येक पायरीवर सामील व्हा. गृहपाठापासून ते शिक्षक पालक सभेपर्यंत प्रत्येक गोष्टीत सहभाग घ्या. 
  • तुमचे आणि तुमच्या मुलाचे संबंध चांगले असतील तर त्याला शाळेत कसलाच त्रास होणार नाही. मुलाना शाळा, नाती, मित्रपरिवार, काम आणि एकंदर मोठं होताना अनेक प्रश्न पडतात. त्यात त्यांना मदत करा. 
  • चांगले श्रोते बना. लहान मुलांना त्यांच्या शाळेविषयी खूप बोलायचं असतं. त्यासाठी थोडा वेळ काढून त्याचं ऐका. थोडं मोठं झाल्यावर ते जास्त बोलत नाहीत. धीर धारा. त्यांच्याशी संवाद साधण्याचे इतर मार्ग शोधा.
  • मुलाचं तोंडभरून कौतुक करा. त्यांनी चांगलं काम केलं तर तुम्हाला त्यांचा अभिमान वाटतो हे त्यांना कळू द्या.
  • मुलांना पाठींबा द्या. गुणाकार किंवा निबंध या सारखा अवघड अभ्यास करताना त्याला मदत करा. शाळेत काही समस्या निर्माण झालीच तर ती  निवारण्यासाठी त्याला पाठींबा द्या.

अभ्यास कसा करावा

अभ्यास कसा करावा

शैक्षणिक यश मिळविण्यासाठी अभ्यास किती वेळ करावा यापेक्षा अभ्यास कसा करावा हे अधिक महत्वाचे आहे. अभ्यासाचा मानसिक ताण निर्माण होऊ नये तसेच शिकलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहाव्यात यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.अभ्यासाच्या चुकीच्या पद्धतीमुळे देखील अपयश येत असते. दिवसरात्र अभ्यास करणे महत्वाचे नसून एकाग्र चित्ताने आणि निग्रहाने अभ्यास करणे गरजेचे असते. 
  • संदर्भयुक्त अभ्यास : केवळ पाठांतरावर भर देण्याऐवजी ‘तपशीलवार अभ्यासा’(Elaborative learning)ची सवय लावून घ्यावी. त्यासाठी एखाद्या शब्दाचे विविध अर्थ आणि उपयोग शब्दसंग्रहातून शोधून काढणे, पाठ्यपुस्तकातील एखाद्या गोष्टीचे इतरत्र संदर्भ शोधणे, गणित, विज्ञान अशा विषयातील तत्वे प्रत्यक्ष व्यवहारातील गोष्टींमध्ये शोधणे अशा प्रकारच्या कृती करता येतील. त्यामुळे अभ्यासातील रटाळपणा कमी होतो आणि अभ्यासाचा कंटाळा येत नाही. शिवाय एकदा शिकलेल्या गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात. 
  • अभ्यास चर्चा ग्रुप : अभ्यास शक्यतो एकटेपणी न करता समवयस्क मित्रांसोबत करावा. अभ्यासाबद्दल मित्रांसोबत चर्चा करावी. चर्चा हा ‘तपशीलवार अभ्यासा’चा अजून एक प्रभावी मार्ग आहे. इतरांशी चर्चा करताना किंवा त्यावर इतरांची मते ऐकताना एकदा वाचलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती होते. त्यामुळे गोष्टी सहजपणे स्मरणात राहतात. 
  • क्षणभर विश्रांती : शिकण्याची प्रक्रिया ही मुख्यतः मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी मेंदूचे स्वास्थ्य अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी पुरेशी झोप घेणे, मानसिक ताणतणाव टाळणे, मोकळ्या वेळात खेळ खेळणे, आपले छंद जोपासणे आवश्यक आहे.    
  • ताजेपणा आणि प्रसन्नता : शक्यतो सकाळच्या प्रसन्न वातावरणात अभ्यास करावा. सकाळच्या वेळेत मेंदू सर्वाधिक कार्यक्षमपणे काम करतो. त्यामुळे सकाळच्या वेळेत अभ्यास करणे लाभदायक ठरते. 
  • आनंददायी व ज्ञानदायी अभ्यास : अभ्यासाकडे केवळ शालेय परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने न पाहता, अभ्यास ही ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया आहे हे लक्षात ठेवावे. कारण अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदल्यामुळे अभ्यासाची पद्धतही बदलते आणि भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी त्याचा फायदा होतो.

अभ्यास आणि झोपेचे महत्व

‘झोप’ या गोष्टीकडे नकारात्मकपणे पाहण्याऐवजी झोप हीसुद्धा आपली एक महत्वाची गरज आहे हे लक्षात ठेवायला हवे. झोपेबद्दल मुख्यतः खूप झोप येणे, झोप न येणे आणि अनियमितपणा अशा तक्रारी केल्या जातात.वस्तुतः सामान्य शारिरीक आणि मानसिक परिस्थितीत झोप शरीराला आवश्यक आहे त्यापेक्षा अधिक झोपेची शरीराकडून मागणी केली जात नाही. खूप झोप येणे किंवा झोप न येणे अशा तक्रारींमागे काही महत्वाची मानसिक कारणे आहेत. मुळात साधारणतः दिवसाला आठ तास (कुमारवयीन मुलांसाठी हे प्रमान नऊ ते दहा तास आणि अल्पवयीन मुलांसाठी यापेक्षाही अधिक) झोपेची गरज असते,(यात व्यक्तीनुसार फरक पडू शकतो)हे लक्षात घेतले जात नाही.
याशिवाय झोपेच्या अनियमित वेळा, चुकीच्या वेळा (रात्री जागणे व दिवसा झोप घेणे), झोपेतून उठल्यांनंतर पुढे येवू घातलेल्या कामांची, अभ्यासाची भीती, कंटाळा किंवा त्या कामात रस नसणे अशा कारणांनी झोपेच्या तक्रारी सुरू होतात. त्यामुळे या गोष्टींमध्ये शिस्त पाळली तरअतिझोपेची तक्रारच करावी लागणार नाही. अभ्यासाच्या वेळापत्रकात सर्व विषयांच्या वेळेचे नियोजन करताना झोपेला मात्र पुरेसा वेळ देण्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण झोपेमुळे शरीराला आलेला थकवा कमी होतो. शरीराच्या विविध भागांची झालेली झीज मुख्यतः झोपेच्या काळात भरून काढली जाते.तसेच शारिरीक आणि मानसिक वाढ तसेच अन्य महत्वाच्या प्रक्रियांशी निगडीत रसायने याच काळात स्त्रवली जातात. त्यासाठी शरीराला झोप अत्यंत गरजेची असते.
पुरेशा विश्रांतीनंतर शरीर पुरेशा ऊर्जेसह पुन्हा कामाला लागू शकते. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अभ्यासात लक्ष न लागणे, चिडचिड होणे, पाठ केलेले लक्षात न राहणे, सतत थकवा जाणवणे, उत्साह कमी होणे असे परिणाम घडून येऊ शकतात. झोपेला महत्व न दिल्यामुळे अभ्यासाचे तास तर वाढतात, मात्र त्याचा प्रत्यक्ष फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुले आणि पालकांनी अभ्यासाचे नियोजन करताना, अभ्यासाइतकीच झोपही महत्वाची आहे, याचे भान ठेवायला हवे.
 

'गुरुकुल' शिक्षण पद्धती

'गुरुकुल' शिक्षण पद्धती

प्राचीन काळात ‘गुरुकुल’ शिक्षण पद्धती होती. गुरुकुल शिक्षण पद्धतीत शिक्षण पूर्ण होईपर्यंत विध्यार्थ्यांना गुरूंच्या आश्रमातच राहावे लागत असे. आश्रमात राहत असतांना विध्यार्थ्यांना स्वतःची, आश्रमाची आणि गुरूंची सर्व कामे करावी लागत असत. यामुळे ते कामसू आणि स्वावलंबी बनत असत. याठिकाणी सर्व विध्यार्थी सोबत राहत त्यांच्यात जातीपातीचा, श्रीमंती-गरिबीचा कुठलाच भेद नसे. भारतात वैदिक काळापासून गुरुकुल अस्तित्वात होते. गुरु द्रोणाचार्य-अर्जुन, द्रोणाचार्य-एकलव्य, सांदिपनी-श्रीकृष्ण यांपासुन ते निवृत्ती महाराज-ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत गुरु शिष्यांची फार मोठी परंपरा या देशाला लाभलेली आहे. ही एक निस्वार्थ शिक्षण पद्धती होती. गुरुकुल हे पूर्णपणे लोकांनी आणि राजाने दिलेल्या देणगीवर चालत असत. यात गुरु कुठलीच अपेक्षा न ठेवता शिष्यांना ज्ञानदानाचे महान कार्य करायचे. ते शिष्यांकडून कोणतीच दक्षिणाही मागत नसत शिष्याला वाटले तर तो त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला जे द्यायचे असेल ते द्यायचा. परंतु शिष्य गुरुंप्रती आजन्म कृतज्ञ  मात्र असायचा. 
शिक्षण: या पद्धतीत विध्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण दिले जात. यात अनेक विद्या, मंत्र-तंत्र, अस्त्र-शस्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, योगशास्त्र इत्यादी अनेक गोष्टींचे शिक्षण-प्रशिक्षण दिले जात असे. शस्त्रांमध्ये त्यावेळी धनुष्यबाण, भाला, गदा, तलवार इत्यादी चालवण्याचे प्रशिक्षण येथे दिले जायचे तर योगशास्त्रात ध्यानधारणा, योगासने, हटयोग, राजयोग, यांचे प्रशिक्षण दिले जात असे. असे परिपूर्ण शिक्षण देण्याचा उद्देश हाच कि गुरुकुल मधून शिकून बाहेर पडलेला विध्यार्थी एक पूर्ण पुरुष असावा. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अष्टपैलू विकास व्हावा.  
हे एक महान शिक्षण पद्धती होती. आजही बऱ्याच ठिकाणी गुरुकुल शिक्षण पद्धती दिसून येते परंतु आजकाल काळाच्या ओघात तिच्यात बरेच बदल झाले आहेत. शिक्षणाचे विषय बरेच मर्यादित आहेत आणि प्रामुख्याने पुस्तकी ज्ञानावरच भर आहे. गुरुकुलाचे नियमही आधीसारखे कठोर राहिलेले नाहीत. या महान शिक्षण पद्धतीचे अनेक फायदे आहेत त्यांचा थोडक्यात विचार करू. 
महत्त्व: 
नियमांनी बांधलेले जीवन: गुरुकुल शिक्षण पद्धतीचे जीवन हे नियमांनी बांधलेले असावे लागते. सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे. रोज स्नान करणे, ध्यान-पूजापाठ करणे, अभ्यास करणे या सर्व गोष्ठी गुरूंच्या देखरेखीखाली कराव्याच लागत असल्यामुळे विध्यार्थ्यांना या नियमबद्ध जीवनाची सवय लागत असे. 
स्वावलंबन: शिष्यांना स्वतःची सर्व कामे स्वतःच करावी लागत असे त्यामुळे ते स्वावलंबी बनत. परावलंबी व्यक्ती स्वप्नातही सुखी होऊ शकत नाही असे रामायणात म्हटले आहे. स्वावलंबन हा खरोखरच एक महान गुण आहे. महात्मा गांधीजी स्वावलंबनाला खूप महत्त्व द्यायचे.  
कष्टाची सवय: आश्रमात झाडलोट करणे, स्वयंपाकात मदत करणे, जंगलातून लाकडे आणणे, पाणी भरणे इत्यादी आश्रमात पडेल ते काम करण्याच्या सवयीमुळे मुले कामसू बनत. ते कष्टांना कधीही भीत नसत. रोजच्या भरपूर कष्टांमुळे त्यांचे शरीर निरोगी आणि सुदृढ बनत. ते शरीर त्यांना आयुष्यभर आपल्या कर्तव्याच्या पालनात मदत करीत असे. 
ब्रह्मचर्यपालन: आश्रमात राहत असतांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत सर्व शिष्यांना ब्रह्मचर्य पालन करावे लागत असे. ब्रह्मचर्यपालनामुळे मुले चारित्र्यवान आणि संयमी बनत. अशाप्रकारे एका चारित्र्यसंपन्न समाजाची निर्मिती करण्याचे कामही गुरुकुल करीत असे. 
तर अशी ही ‘गुरुकुल’ शिक्षण पद्धती सर्वांगाने सुंदर आणि महान होती. आज ती पूर्वीसारखी राहिली नाही तरीही या पद्धतीचे काही फायदे आजच्या गुरुकुल पद्धतीतही होताना दिसून येतात. गुरुकुल मध्ये राहिलेली मुले थोड्याफार प्रमाणात तरी स्वावलंबी असतात. ती घरापासून दूर राहू शकतात. सकाळी लवकर उठणे, रोज स्नान करणे इत्यादी सारख्या काही चांगल्या सवयीही त्यांना लागतात. 

शिक्षण

शिक्षण 

खालील आवश्यक घटकांवर क्लीक करा 

  1. 'गुरुकुल' शिक्षण पद्धती
  2. अभ्यास आणि झोपेचे महत्व
  3. अभ्यास कसा करावा
  4. उत्तरपत्रिका (पेपर) लिहीण्याची कला
  5. गृहपाठात मदत
  6. नाविन्याचा शोध
  7. नेहमीपेक्षा वेगळा विचार
  8. परीक्षेदरम्यान आरोग्याची काळजी
  9. पालक-विद्यार्थी संवाद
  10. प्राचार्यांची जबाबदारी
  11. प्राथमिक शिक्षण
  12. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण
  13. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी
  14. माध्यमिक शिक्षण
  15. मुलांची एकाग्रता–कारणे व उपाय
  16. मुलांमधील टिव्ही अॅडिक्शन घालविण्यासाठी
  17. मुलाला शाळेत पाठवण्याची पूर्वतयारी
  18. राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
  19. वर्तमानपत्राद्वारे मुलांचा भाषा विकास
  20. वाचन
  21. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण आणि ज्ञानेंद्रियांचा विकास
  22. शाळेची निवड
  23. समाजातीलदुर्बल घटकातील मुलांना शिक्षण
  24. सर्जनशील विचारातील घटक
  25. सर्व शिक्षा अभियान
  26. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
  27. स्पर्धेला सामोरे जाताना (परीक्षा- रिझल्टमधील तीव्र स्पर्धा सांभाळण्यासाठी)

आर. टी . ई (शिक्षणाचा अधिकार )

अतिरिक्त माहितीसाठी वरील लोगोवर २ वेळा क्लिक करा 

बालशिक्षण हक्क कायद्याच्या मुख्य तरतुदी

  1. • सहा ते चौदा वर्ष वयोगटातल्या सर्व मुलांना जवळच्या सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण (इयत्ता १ ते ८) पूर्ण होईपर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. ही जवळची शाळा 2013 पर्यंत स्थापन झाली पाहिजे.

    1. सर्व मुलांना अधिकृत शाळेमध्ये पूर्ण वेळ प्राथमिक शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. याबाबतीत अर्धवेळ चालवले जाणारे वर्ग/ अनौपचारिक शाळा किंवा अनधिकृत शाळा यांना कायदेशीर पर्याय समजले जाणार नाही.
    2. बालशिक्षण हक्क कायद्यात नमूद केल्याप्रमाणे सर्व अधिकृत शाळांनी उत्तम दर्जाचं शिक्षण पुरवलं पाहिजे. त्यात मूलभूत सुविधा, शिकवण्याचे किमान तास आणि पुरेशी शिक्षक संख्या या काही किमान अटींची पूर्तता २०१३ पर्यंत झाली असली पाहिजे. अधिकृत शाळांमधले सर्व शिक्षक २०१५ पर्यंत शैक्षणिकदृष्ट्या पात्र असले पाहिजेत.
    3. बालशिक्षण हक्क कायद्यातल्या २५% आरक्षणाच्या तरतुदीप्रमाणे, काही आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीतल्या मुलांना, त्याचप्रमाणे अपंग मुलांना , खासगी विना अनुदानित आणि अल्प अनुदानित शाळांत, तसंच काही विशेष वर्गवारीतल्या शाळा,उदाहरणार्थ , केंद्रिय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळांत,मोफत शिक्षण मिळेल.
    4. कुठलीही शाळा मुलांकडून देणगी किंवा कॅपिटेशन फी स्वीकारू शकणार नाही, त्याचप्रमाणे मुलांच्या अगर त्यांच्या पालकांच्या मुलाखतींवर,तसंच मुलांच्या चाचणीवर किंवा इतर पडताळणींवर मुलांचा शाळा- प्रवेश आधारलेला नसेल.
    5.  कुठल्याही मुलाला शाळेत शारीरिक शिक्षा अगर मानसिक छळाला सामोरे जावे लागणार नाही. कुठल्याही मुलाला त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच इयत्तेत परत बसवले जाणार नाही किंवा शाळेतून काढून टाकले जाणार नाही.
    6. बहुतेक सर्व शाळांना आपापल्या शाळेत, मुख्यत्वे पालकांची मिळून बनलेली 'शाळा व्यवस्थापन समिती' (स्कूल मॅनेजमेंट कमिटी) स्थापन करावी लागणार आहे. शाळेच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, शाळेला मिळालेल्या आर्थिक मदतीच्या विनियोगाकडे लक्ष ठेवणे आणि 'शाळा विकास योजना' (स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन)बनवणे ही या शाळा व्यवस्थापन समितीची मुख्य कामे असतील.
    7. या कायद्याची अंमलबजावणी व्हावी याकरता आर्थिक मदत देण्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची संयुक्तरित्या असली, तरी राज्यसरकार आणि स्थानिक संस्था याच याकरता मुख्यत्वे जबाबदार राहतील.
    8. या कायद्याची अंमलबजावणी होते आहे यावर नजर ठेवण्याची आणि कायद्याचा भंग केला जात आहे अशा तक्रारी आल्यास त्यांची शहानिशा करण्याची जबाबदारी राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोग (नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइटस -एन सी पी सी आर) आणि राज्य बालहक्क सुरक्षा आयोग (स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइटस -एस सी पी सी आर) यांची आहे.
    9. बालशिक्षण हक्क कायद्याच्या काही किंवा सर्वच तरतुदीतून काही शाळांना वगळण्यात आलेले आहे. 

बालशिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदींचे तपशील

मुलांचे हक्क : जवळच्या सरकारी शाळांतून मोफत प्राथमिक शिक्षण मिळण्याबद्दलच्या तरतूदी

  1. सहा ते चौदा वर्ष वयोगटातल्या सर्व मुलांना जवळच्या सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत (इयत्ता १-८) मोफत शिक्षण मिळण्याचा हक्क आहे.
  2. या जवळच्या सरकारी शाळेत मोफत शिक्षण मिळण्याच्या हक्कात लिंग, धर्म, वर्ग, जात यांचे भेद न मानता सर्व मुलांचा समावेश केला गेला आहे. त्यात शारीरिकदृष्ट्या आणि इतर अपंग मुलांचाही समावेश आहे.
  3. राज्य सरकारी आणि स्थानिक शैक्षणिक संस्था 2013 पर्यंत जिथेजिथे गरज आहे तिथेतिथे जवळच्या सरकारी शाळा उभारतील . 'जवळच्या' अंतराचे निकष आणि मर्यादा राज्य सरकार आणि स्थानिक शैक्षणिक संस्था ठरवतील.
जवळची शाळा :महाराष्ट्र राज्याच्या नियमात असे नमूद केलेले आहे, की जवळची शाळा म्हणजे राज्य सरकारी आणि स्थानिक शैक्षणिक संस्थांनी इयत्ता 1 ते 5 च्या वर्गांकरता 1 किलोमीटरच्या परिसरात , तर इयत्ता 6 ते 8 च्या वर्गांकरता 3 किलोमीटरच्या परिसरात शाळा उपलब्ध करून दिली पाहिजे. 
मोफत : 'मोफत शिक्षण' याचा अर्थ सरकारी शाळांतून मुलांना कोणतीही फी आकारली जाणार नाही, अथवा त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या देणग्या घेतल्या जाणार नाहीत.
  1. सरकारी शाळांच्या दृष्टीने 'मोफत शिक्षण' म्हणजे, अनेक मुलांना शालेय खर्चाच्या भारामुळे प्राथमिक शिक्षण पूर्ण करता येत नाही, त्यांच्यावरचा हा खर्चाचा भार कमी करण्याच्या उद्देशाने मुलांना पाठ्यपुस्तके, गणवेश, लेखन -साहित्य,तसेच अपंग मुलांकरता विशेष साहित्य पुरवणे.

  1. सरकारकडून त्यांचा दैनंदिन खर्च भागवला जाईल इतक्या प्रमाणात सरकारी अनुदानित शाळांनी मुलांना मोफत शिक्षण पुरवले पाहिजे. मोफत शिक्षण मिळणार् या मुलांचे हे प्रमाण 25% पेक्षा कमी नसावे .
  2. पालक आपल्या मुलांना जवळच्या मोफत सरकारी शाळांऐवजी इतर शाळांतून पाठवण्याचं ठरवू शकतात.

मुलांचे हक्क : खाजगी आणि विशिष्ट वर्गवारीतल्या नमूद केलेल्या शाळांतून प्रवेश घेणारया एकूण मुलांच्या संख्येपैकी २५% मुलांना मोफत प्राथमिक शिक्षण.
  •   बालशिक्षण हक्क कायद्याच्या २५% राखीव जागांच्या तरतुदीप्रमाणे आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीतील मुले, त्याचप्रमाणे अपंग मुले यांना फक्त इयत्ता 1लीत किंवा पूर्व -प्राथमिक स्तरावर , खाजगी विना -अनुदानित आणि अल्प- अनुदानित शाळा ,तसेच केंद्रिय विद्यालय , नवोदय विद्यालय आणि सैनिकी शाळा अशा विशिष्ट वर्गवारीतल्या शाळांतून प्रवेश मिळेल.
  • या मुलांना मोफत शिक्षण आणि त्याअंतर्गत पाठ्यपुस्तके आणि इतर सुविधा मिळतील.
  • या २५% राखीव जागांच्या तरतुदींतून अल्प -अनुदानित शाळा, मदरसे, वैदिक शाळा, पाठशाळा, धर्माचे शिक्षण देणार्या शाळा, निवासी शाळा, अनाथालये यांना वगळण्यात आलेले आहे.

मुलांचे हक्क : शाळेमध्ये प्रवेश मिळवण्याकरताच्या तरतुदी - कॅपिटेशन फी अगर मुलाखती देण्याची आवश्यकता नाही.
  • शाळेत प्रवेश घेण्याकरता कुठल्याही मुलाला अगर त्याच्या पालकांना कोणत्याही चाचण्या, मुलाखती किंवा अन्य पडताळणीला सामोरे जावे लागणार नाही. तसेच त्यांना कॅपिटेशन फी किंवा कोणत्याही स्वरूपाची देणगीही भरावी लागणार नाही.
  • या अटींचा भंग करणार्या शाळांना मोठ्या दंडाला सामोरे जावे लागेल.
  • वयाच्या दाखल्याअभावी कोणत्याही मुलाला प्रवेश नाकारला जाणार नाही. वयाच्या अधिकृत पुराव्याचे कागदपत्र देईपर्यंत मुलाला शाळेत प्रवेश दिला जावा.

मुलांचे हक्क : वयाने मोठ्या असलेल्या मुलांना आणि बदली होऊन आलेल्या मुलांना शाळेत प्रवेश मिळण्यासाठीच्या तरतूदी
  • जर एखादा मुलगा पात्र वयापेक्षा मोठा असेल किंवा तो त्यापूर्वी कोणत्याही शाळेत कधीच गेला नसेल तरी त्याला शाळेत प्रवेश नाकारला जाऊ नये.
  • अशा मुलांना त्यांच्या वयाला अनुरूप इयत्तेत प्रवेश दिला गेला पाहिजे आणि वर्गातील इतर मुलांच्या बरोबरीने त्यांची पात्रता यावी याकरता त्यांना विशेष प्रशिक्षण आणि शाळेच्या तासांव्यतिरिक्त जादा शिकवणी दिली गेली पाहिजे.
  • जर एखाद्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची सोय नसेल ,तर त्या शाळेतल्या मुलांना सरकारी अगर सरकारी अनुदानित शाळेत बदली करून मिळण्याचा हक्क आहे.
  • राज्यातल्या किंवा राज्याबाहेरच्या सरकारी अगर सरकारी अनुदानित शाळेत बदली करून मिळण्याचा मुलांना हक्क आहे.
  • बदलीचे प्रमाणपत्र सादर करण्यात झालेला विलंब हे मुलाला शाळेत प्रवेश देण्याकरता दिरंगाई करण्याचे किंवा शाळेत प्रवेश नाकारण्याचे कारण होऊ शकत नाही.

मुलांचे हक्क आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण : अधिकृत पूर्णवेळ शाळांकरताच्या तरतुदी
  • सक्षम सरकारच्या/ स्थानिक शैक्षणिक सरकारी सूत्रांच्या मान्यता प्रमाणपत्राशिवाय, कोणतीही शाळा चालवली जाऊ शकणार नाही.
  • अशा तर्हेचे मान्यता प्रमाणपत्र मिळवण्याच्या निकषांमध्ये मुख्यत्वे, शाळेतील सुविधा, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर, विशेष शिक्षकांचे किमान शिकवण्याचे तास आदी अनेक तरतुदींची पूर्तता प्रत्येक खाजगी शाळेमध्ये २०१३ पर्यंत करावी लागणार आहे. सर्व शिक्षक २०१५ पर्यंत शैक्षणिकदृष्ट्या पात्र असावे लागतील.
  • सर्व सरकारी, सरकारी -अनुदानित आणि विशिष्ट वर्गवारीतल्या अशा सर्वच शाळांना वरील तरतुदींची पूर्तता 2013 आणि 2015 पर्यंत करावी लागणार आहे.
  • सर्व मुलांना पूर्णवेळ चालवल्या जाणार्या अधिकृत शाळांमधून भरती केले गेले पाहिजे, आणि त्यांना शैक्षणिकदृष्ट्या पात्र शिक्षकांकडून शिक्षण मिळाले पाहिजे. हे शिक्षक 2015 पर्यंत अर्हता प्राप्त झाले पाहिजेत.
  • जिथे सहसा अर्ध-वेळ काम करणारे आणि अर्हता प्राप्त नसलेले शिक्षक शिकवतात असे स्वयंसेवी संस्था अगर सरकारतर्फे चालवले जाणारे अर्ध वेळाचे शैक्षणिक वर्ग/ शाळा/ पूरक अभ्यास वर्ग, हे पूर्णवेळ चालवल्या जाणार्या अधिकृत खाजगी, सरकारी,सरकारी अनुदानित आणि विशिष्ट वर्गवारीतल्या शाळांना कायदेशीर पर्याय समजले जाणार नाहीत.

मुलांचे हक्क आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण : शाळेने एप्रिल २०१३ पर्यंत पूर्तता करण्याच्या नियम आणि निकषांबद्दलच्या तरतुदी
  • बालशिक्षण हक्क कायद्याच्या 'शाळेकरता नियम आणि निकष '('नॉर्म्स अँड स्टॅँडर्ड फ़ॉर अ स्कूल') या नियमावलीत (शेड्यूल) शाळेतील सुविधा आणि शिक्षक याबाबतचे विशिष्ट तपशील नमूद केलेले आहेत . प्रत्येक शाळेत एप्रिल २०१३ आवश्यक त्या संख्येतल्या सुविधा आणि शिक्षक उपलब्ध असले पाहिजेत.

मुलांचे हक्क आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण : २०१३ पर्यंत पूर्तता झाली पाहिजे अशा शाळातील सुविधा आणि पूर्णवेळ शाळांबद्दलच्या तरतुदी
  • सर्व ऋतूंमध्ये टिकाव धरेल अशी पक्की इमारत, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी मूलभूत सुविधांनी प्रत्येक शाळा २०१३ पर्यंत सुसज्ज असली पाहिजे.
  • इयत्ता १ ली ते ५ वी करता २०० कामाचे दिवस आणि ८०० शिकवण्याचे तास, आणि इयत्ता ६ ते ८ वी करता २२० कामाचे दिवस आणि १००० शिकवण्याचे तास असले पाहिजेत.
मुलांचे हक्क आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण : २०१३ पर्यंत पूर्तता झाली असली पाहिजे असे शिक्षक-विद्यार्थी यांचे नमूद केलेले प्रमाण आणि विशेष शिक्षकांची नियुक्ती या बद्दलच्या तरतुदी.
  • प्राथमिक शाळेच्या इयत्ता १ ली ते ५ वी या वर्गामध्ये ३० विद्यार्थ्यांकरता किमान एका शिक्षकाची नियुक्ती आणि उच्च प्राथमिक शाळेच्या ६ वी ते ८ वी या वर्गांमध्ये ३५ विद्यार्थ्यांकरता किमान एका शिक्षकाची नियुक्ती या तरतूदींची पूर्तता २०१३ पर्यंत झाली असली पाहिजे.
  • विद्यार्थ्यांची एकूण संख्या १५० पेक्षा जास्त असलेल्या कनिष्ठ प्राथमिक वर्गाकरता एक मुख्याध्यापक असला पाहिजे.
  • उच्च प्राथमिक वर्गांमध्ये गणित आणि शास्त्र या विषयांकरता विशेष विषयांचे शिक्षक असले पाहिजेत.
  • विद्यार्थ्यांची एकूण संख्या १५० पेक्षा जास्त असलेल्या उच्च प्राथमिक वर्गांमध्ये एक मुख्याध्यापक आणि कला, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभवाकरता अर्ध-वेळाचे शिक्षक असले पाहिजेत.

मुलांचे हक्क आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण- शिक्षणाच्या पद्धती आणि आशय याबद्दलच्या तरतुदी
  • अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटनेने जतन केलेल्या मूल्यांचे प्रतिबिंब पडलेले दिसेल आणि त्यात मुलांच्या सर्वांगीण विकासाचा आणि मुलांना सहजसोप्या वाटतील अशा आणि मूलकेंद्रित उपक्रमांतून शिकणं यांचा विचार केलेला असेल.
  • मुलांच्या द्न्यानाचे आणि ते वापरण्याच्या त्यांच्या क्षमतेचे सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापन
  • प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कुठल्याही मुलावर कोणतीही बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन नाही.
  • कुठल्याही मुलाला शाळेत शारीरिक शिक्षा अगर मानसिक छळाला सामोरे जावे लागणार नाही. कुठल्याही मुलाला त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच इयत्तेत परत बसवले जाणार नाही किंवा शाळेतून काढून टाकले जाणार नाही.

मुलांचे हक्क आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण- राज्य सरकारांच्या/महाराष्ट्र सरकारच्या नियमांमधील तरतुदी आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका 

काही राज्यांच्या नियमात शिक्षणाच्या गुणवत्तेचे काही अधिक पैलू समाविष्ट केलेले आहेत.महाराष्ट्र राज्याच्या नियमात नमूद केलेले आहे की शैक्षणिक संस्थेला याबाबत कळवले जाईल आणि त्यांच्या कार्यात पुढील गोष्टींचा समावेश असेल:
  • अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या पद्धती विकसित करणे.
  • प्रत्येक इयत्तेच्या शैक्षणिक निष्पत्तीचा आलेख काढणे.
  • पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीत इतर राज्य-पातळीवरच्या संस्थांबरोबर सहकार्य करणे.
  • शिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांची आखणी करणे.
  • अर्थपूर्ण आणि सृजनशील काम करणार् या शाळांना परवानगी मिळावी याकरता मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे.
  • शाळाच्या सर्वंकष मूल्यमापन पद्धती आखतांना सहकार्य करणे.

महाराष्ट्र राज्याच्या नियमात गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हमीत या पलीकडे जाऊन पुढील काही मुद्द्यांचा समावेश केलेला आहे:
  • ठराविक कालावधीनंतर नियमितपणे खुद्द त्या शैक्षणिक संस्थेचे आणि त्याबरोबरच राज्य-सरकारी पातळीवरच्या आणि इतर नियोजन संस्थांचे मूल्यमापन.
  • शाळेतून हे मूल्यमापनाचे अहवाल जनतेसमोर अवलोकनार्थ ठेवणे.

अंमलबजावणी : केंद्र आणि राज्य सरकारांच्या आणि स्थानिक सरकारी संस्थांच्या जबाबदारीविषयक तरतूदी

इतर जबाबदार्यांसोबतच बालशिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीला राज्य सरकारबरोबर संयुक्तपणे आर्थिक सहाय्य पुरवणे ही केंद्र सरकारची मुख्य जबाबदारी आहे.
बालशिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करणे आणि त्यावर देखरेख ठेवणे याची मुख्य जबाबदारी राज्य सरकार आणि स्थानिक सरकारी संस्थांवर आहे. यामध्ये कायद्याच्या अंमलबजावणीचे नियम सूचित करणे, त्याचप्रमाणे कायद्याच्या अंमलबजावणीकरता अधिसूचना जारी करणे यांचा समावेश आहे.बालशिक्षण हक्क विभाग 8 आणि विभाग 9 मद्ध्ये राज्य सरकारच्या आणि स्थानिक सरकारी शैक्षणिक संस्थांच्या जबाबदार् या नमूद केलेल्या आहेत.

कायद्याच्या बालशिक्षण हक्क कायद्याच्या 'सक्तीचे' या शब्दाच्या व्याख्येतच राज्याच्या आणि स्थानिक सरकारी शैक्षणिक संस्थांच्या अनेकविध जबाबदार् यां ची झलक बघायला मिळते. या कायद्याच्या एका मूलभूत तरतुदीत ही व्याख्या आहे. त्यात असे म्हटले आहे ," सहा ते चौदा वर्षे वयोगटातल्या प्रत्येक मुलाला प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत जवळच्या शाळेत मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्क आहे." या कायद्याच्या विभाग 8 आणि विभाग 9 मद्ध्ये नमूद केल्याप्रमाणे 'सक्तीचे' म्हणजे राज्य आणि स्थानिक सरकारी शैक्षणिक संस्थांनी-
  • 2013 पर्यंत जवळची शाळा उपलब्ध करून दिली पाहिजे.
  • सक्तीचा शाळाप्रवेश, उपस्थिती आणि प्राथमिक शिक्षणाची 8 वर्षे पूर्ण होतील या सर्व गोष्टींची खातरजमा केली पाहिजे.
  • आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीतल्या मुलांना भेदभावाची वागणूक मिळणार नाही याची हमी घेणे.
  • गरजू विद्द्यार्थ्यांच्या मदतीकरता प्रशिक्षण उपलब्ध करून देणे.
  • या कायद्याच्या नियमावलीच्या (शेड्यूल) आवश्यकतेप्रमाणे 2013 पर्यंत सर्व शाळांमद्ध्ये आवश्यक त्या सुविधा आणि शिक्षकांची पुरेशी संख्या असली पाहिजे याकरता आवश्यक ती उपाययोजना करणे 
  • या कायद्याच्या विभाग 8 आणि विभाग 9 मद्ध्ये सविस्तर दिलेली इतर कामे करणे.
अंमलबजावणी – राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइटस् (एन. सी. पी. सी. आर.)) 
आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (स्टेश कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइटस् (एस सी पी सी आर)) आणि इतर संस्था यांच्या भूमिकेबद्दलच्या तरतूदी
  • प्रत्येक राज्यात स्थापन करण्यात येणार्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांची प्रमुख कार्य बाल शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मुलांच्या हक्कांची जपणूक करणे, सर्व शाळांतून या कायद्याची अंमलबजावणी कशी होते आहे यावर लक्ष ठेवणे आणि तक्रारींबद्दल चौकशी करणे ही असतील.
  • बालशिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात ज्या काही तक्रारी असतील त्या स्थानिक सरकारी संस्थांकडे आणि राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग, तसेच राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांच्याकडे नोंदवाव्यात, या संस्था या तक्रारींवर उपाय शोधण्यास फक्त मदत करतील. कारण एखाद्या न्यायालयाला असलेले न्यायालयीन अधिकार मात्र राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग किंवा राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे नाहीत. हे इथे लक्षात ठेवलं पाहिजे.
  • बाल शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदींच्या परिणामकारक अंमलबजावणीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही सल्लागार परिषदांची (अॅडव्हायजरी कौन्सिल्स) स्थापना करावी लागेल.

अंमलबजावणी – शाळांच्या आणि शाळा व्यवस्थापन समितींच्या भूमिकेबद्दलच्या तरतूदी.
  • याअगोदर उल्लेख केलेल्या शाळाप्रवेश, शाळेत सुविधा उपलब्ध करून देणे, शाळेत पात्र शिक्षक असणे, गुणात्मक शिक्षण पुरवणे, शाळेला अधिकृत दर्जा मिळवणे इत्यादी गोष्टींबाबतच्या शाळांच्या इतर जबाबदार्यांसोबतच शाळा व्यवस्थापन समिती (स्कूल मॅनेजमेंट कमिटी एस एमसी) स्थापन करणे आणि ती चालवणे ही सर्व शाळांची एक मुख्य जबाबदारी राहील.
  • ही शाळा व्यवस्थापन समिती मुख्यत्वे पालक सभासदांची मिळून बनलेली असेल. प्रत्येक राज्य आपआपल्या स्वतंत्र नियमांनुसार या समितीची रचना आणि तिचे कार्य ठरवतील.
  • शाळेच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, आर्थिक सहाय्य म्हणून मिळालेल्या सर्व निधीचा योग्य तो विनियोग करणे, त्याचबरोबर शाळा विकास आराखडा (स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन (एस. डी. पी.)) बनवणे ही शाळा व्यवस्थापन समितीची मुख्य कार्ये आहेत.

बालशिक्षण हक्क कायद्यातून पूर्ण/ अंशत: सूट :
  • बालशिक्षण हक्क कायदा जम्मू आणि काश्मीर या राज्याचा अपवाद वगळता संपूर्ण भारतभर लागू आहे.
  • मदरसे, वैदिक पाठशाळा, आणि मुख्यत्वे धर्माचे शिक्षण देणार्या शैक्षणिक संस्था यांना २०१२ च्या दुरुस्तीअन्वये (२०१२ आमेंडमेंट) बालशिक्षण हक्क कायद्यातून वगळण्यात आलेले आहे.
  • विना अनुदानित अल्प शाळांनाही २०१२ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे बालशिक्षण हक्क कायद्यातून वगळण्यात आलेले आहे.
  • शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्याच्या तरतुदीतून खाजगी विनाअनुदानित शाळांना बालशिक्षण हक्क कायद्याद्वारे वगळण्यात आलेले आहे.
  • अल्प अनुदानित शाळा आणि सरकारी अनुदानित शाळांतील, शाळा व्यवस्थापन समिती फक्त सल्लागाराच्या भूमिकेतून कामे करतील.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या अधिसूचने अन्वये केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वात हे नमूद केलेले आहे, की ज्या निवासी शाळा इयत्ता पहिलीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देतात, अशा शाळांना,शाळा प्रवेशाकरता २५% आरक्षण ठेवण्याची अट लागू नाही.
  • ज्या निवासी शाळात इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग आहेत अशा शाळांतून प्रवेशाकरताची २५% आरक्षणाची अट दिवसाच्या शाळेला फक्त लागू आहे.

बालशिक्षण हक्क कायद्याच्या मसुद्याकरता इथे क्लिक करा

दुरुस्ती

बालशिक्षण हक्क कायद्यातील दुरुस्ती 2012, संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही गृहात संमत केलेली आहे. या दुरुस्तीत खालील तरतुदींचा समावेश आहे:
  • मदरसे, वैदिक पाठशाळा आणि मुख्यत्वे धर्माचं शिक्षण देणार्या शैक्षणिक संस्था यांना बाल शिक्षण हक्क कायद्यातून वगळण्यात आलेले आहे .
  • `प्रतिकूल परिस्थितीतील' या संज्ञेची व्याख्या व्यापक करून त्यात अपंग मुलांचा समावेश केला गेला आहे आणि `अपंग' या शब्दाची व्याख्याही व्यापक केलेली आहे.
  • अल्प अनुदानित शाळा आणि सरकारी अनुदानित शाळांतून असलेल्या शाळा व्यवस्थापन समिती फक्त सल्लागाराच्या भूमिकेतून काम करतील.
2012च्या दुरुस्तीकरता इथे क्लिक करा

ब्लॉग विषयी


नमस्कार मित्रांनो ,
                         मला असा एक ब्लॉग लिहायचा  होता कि, त्याचा उपयोग सर्वांना घेता यावा या हेतूने व 
मी एक प्राथमिक शिक्षक असल्यामुळे मला शिक्षकांच्या अडचणी  कोणत्या , कश्या व केव्हा येतात 
याबद्दल चांगली जाणीव असल्यामुळे , तसेच काहीना शिक्षक पेश्यामध्ये करियर घडवायचे असते त्यांना हि 
मार्गदर्शक ठरेल व भावी शिक्षकांना  याची मदत होईल आणि मुलांना घडवण्यासाठी जागरूक असणाऱ्या पालकांना मदत होईल या स्वच्छ हेतुने  हा ब्लोग लिहताना  मला आनंद होत आहे ………….   अपेक्षा करतो कि हा ब्लॉग आपणास नाक्की आवडेल  …………………। 


                                                                                                                                                                                         आपला  मित्र