Monday, 2 December 2013

मुलांमधील टिव्ही अॅडिक्शन घालविण्यासाठी

मुलांमधील टिव्ही अॅडिक्शन घालविण्यासाठी

खेडे असो किंवा शहर, आई वडिल आणि मुलगा ही तीनही जण टीव्हीच्या समोर बसून टीव्ही पाहात आहेत, हे चित्र अगदी सर्रास दिसून येते आहे. मुलांनी त्रास देऊ नये, पटकन जेऊन टाकावे म्हणून सुरुवातीला टीव्हीसमोर बसून जेवण्याचे आमिष दाखविले जाते. पण नंतर मात्र, ही गोष्ट सवयीमध्ये कधी बदलते याचा पत्ता लागत नाही. कार्टुन चॅनेलवर दाखविण्यात येणाऱ्या अनेक कार्टुनमध्ये दाखविण्यात येणारा हिंसाचार मुलांच्या वागण्यातही दिसायला लागतो. भीमासारखा लाडू खाल्ला की दुसऱ्याला ठोसा मारायची शक्ती येते, इतकीच गोष्ट मुलांच्या लक्षात राहते. त्यामागचा विचार मुलांना समजण्याइतकी मुले मोठी नसतात. टीव्ही अती पाहण्यामुळे मुलांचा अभ्यास आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांमधील टीव्हीचे व्यसन कमी व्हावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. 
  • वेळावर नियंत्रण - मुलांनी टिव्ही पाहूच नये अशी सक्ती केल्यास मुले टिव्ही पाहणे सोडणार नाहीत, हे लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी टिव्ही किती वेळ पाहावा यावर पालकांचा कंट्रोल असायलाच हवा. पालक जो कार्यक्रम पाहतील, तो कार्यक्रम साहजिकपणे मुलेही तोच कार्यक्रम पाहतात. त्यामुळे स्वतः पालकांनीच टिव्ही पाहण्याच्या वेळावर नियंत्रण ठेवले पाहिजे. ठराविक वेळ झाल्यावर टिव्ही बंद करण्याची सवय मुलांना लावण्याचा प्रयत्न करावा.  
  • मुलांसाठी वेळ द्या – अनेकदा पालकांना वेळ नाही म्हणून टिव्ही लावण्यात येतो. ही गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे. मुलांसाठी तुमचा दिवसामधला काही वेळ राखून ठेवा. त्यांच्याशी खेळा, त्यांच्याशी बोला. त्यामुळे मुलांशी संवाद साधला जाईल. 
  • जेवताना टिव्ही नकोच – टिव्हीसमोर बसून जेवण्याने अनेकदा जेवणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे जेवताना टिव्ही नकोच.  
  • अवांतर वाचन आणि खेळ – संध्याकाळी अनेक ठिकाणी मुलांसाठी खेळ आणि व्यायाम घेतला जातो. अशा एखाद्या मैदानावर नाव नोंदविल्यास, टिव्ही पाहण्याचा वेळ आपोआप कमी होतो. त्याचप्रमाणे रोजचा वर्तमानपत्र वाचणे, छोटी गोष्टींची पुस्तके वाचणे या गोष्टी सुरू केल्यास, टिव्ही पाहणे आपोआप कमी होते.

मुलांची एकाग्रता–कारणे व उपाय

मुलांची एकाग्रता–कारणे व उपाय

अभ्यासात किंवा कोणत्याही खेळात काही मिनिटांतच कंटाळा आल्याचे लहान मुलांमध्ये नेहमीच दिसून येते. अशा मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव असतो. एकाग्रतेचा अभाव असणा-या मुलांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मुलांमधील एकाग्रता वाढविणे, ही पालकांसमोरील मोठी समस्या आहे.कायम एकाच गोष्टीवर एकाग्र राहणे, वयस्कर व्यक्तीलाही शक्य नसते, त्यामुळे लहान मुलांकडून पूर्ण एकाग्रतेची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
खेळाकडे असणारा ओढा, शाळा आणि अभ्यासाविषयी कंटाळा, शाळेविषयी मोकळेपणा हिरावून घेत असल्याची भावना यांचा परिणाम एकाग्रतेवर होत असतो. अलिकडच्या काळाच कार्टून पाहण्याचे आणि व्हीडिओ गेम खेळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या दोन्हींचील वेगामुळे मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. आहारातील चुकीच्या सवयी, विशेषतः लोहाचा अभाव आणि पुरेशी ऊर्जा निर्माण करू न शकणारे अन्न यांमुळे मुलांमधील एकाग्रता कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
मुलांची एकाग्रता वाढविण्याचा प्रयत्न करताना, ही समस्या आहे आणि त्यावर उपाय करताना मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण करत नाही, याची काळजी घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. अभ्यासातील एकाग्रता वाढविण्यासाठी मुलांमध्ये अभ्यासाविषयी रस निर्माण करणे आवश्यक आहे. मुलांच्या आवडी आणि छंद यातून त्यांचा अभ्यासातील रस वाढविण्याची गरज आहे. मुले एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्षही करू शकतात. अशावेळी मुलांना चुकीच्या गोष्टीसाठी न रागवता, त्यांच्या चांगल्या गोष्टींचे कौतुक केल्यास, त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. एकाग्रता न होणे, यामागे मुलांची स्वतःच्या काही समस्या असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. त्या समस्यांची उकल करणे, हे सर्वांत आधी आवश्यक आहे.चांगल्या कामांबद्दल मुलांना योग्य बक्षीस द्यायला हवे. अभ्यास करताना टीव्ही बंद ठेवण्याचा कटाक्ष पाळायला हवा.बुद्धीबळ, कथाकथन, आकडेमोडीचे खेळ यांतून एकाग्रता वाढण्यास मदत होते. 

माध्यमिक शिक्षण

माध्यमिक शिक्षण

माध्यमिक शिक्षण म्हणजे इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी पर्यंतचे शिक्षण होय. याच वयात विद्यार्थी मुलांना काही गोष्टी समजून त्यावर ते विचार करायला लागतात आणि अभ्यास व शिक्षणासोबत शिस्तही लागते.
शाळेमध्ये माध्यमिक शिक्षणात मुल्यशिक्षण, भाषा, गणित, विज्ञान, इतिहास आदी विषय शिकवले जातात. स्पर्धा आणि स्कॉलरशिप परीक्षामधून मुलांची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता कळते. विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस आकार मिळण्यास या बाबी महत्वाच्या ठरतात.शैक्षणिक जीवनात माध्यमिक शिक्षण मोलाची भूमिका बजावते.  

माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी

माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी

माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकावर विविध प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या असतात. मुख्याध्यापक हा एक शिक्षक तर असतोच परंतु त्याच बरोबर तो एक उत्तम प्रशासकही असावा लागतो. विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक, नैतिक, सामाजिक विकासापासून ते पालकांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या पगारापर्यंत सर्वच गोष्टींची काळजी मुख्याध्यापकाला घ्यावी लागते. वेगवेगळया स्तरांवरील त्यांच्या जबाबदाऱ्यांचा थोडक्यात विचार करू. 
१. शाळेतील जबाबदाऱ्या: संपूर्ण वर्षाचे नियोजन करणे, विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती तपासणे, शिक्षक वेळेवर त्यांना दिलेल्या तासिका घेतात कि नाही ते तपासणे, त्यांचे मूल्यमापन करणे, वार्षिक, सहामाही, घटक चाचणी इत्यादी परीक्षांचे नियोजन करणे, सांस्कृतिक, कलाविषयक आणि क्रीडा कार्यक्रमांचे नियोजन करणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांची अध्यायावतता सांभाळणे, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यासंबंधीत कार्यक्रमांचे नियोजन करणे, विविध स्पर्धांचे आयोजन बक्षिश वितरण करणे, शाळेतील कार्यक्रमांच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणे, इत्यादी 
२. प्रशासकीय: शिक्षकांच्या सुट्ट्यांचे नियोजन, शिक्षणाधीकाऱ्यांना रिपोर्टिंग, सर्विसबुक मेंटेनन्स, आवक-जावक पाहणे, शाळेच्या इमारतीची डागडुजी करून घेणे, त्यासंबंधित खर्चाचा हिशेब ठेवणे, विविध विषयांवर शिक्षकांच्या, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेणे, विविध उच्चस्तरीय बैठकींना उपस्थित राहणे, इत्यादी. थोडक्यात शाळेच्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून सर्वच स्तरांवर कामकाज योग्यरीत्या होत आहे कि नाही हे पाहण्याची जबाबदारी मुख्याध्यापाकावरच असते.
३. विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील दुवा: कुठलीही तक्रार किंवा विनंती असल्यास पालक सर्व प्रथम मुख्याध्यापाकांनाच भेटतात. पालक-शिक्षक-विद्यार्थी संवाद घडवून आणण्यासाठी पालक सभा आयोजित करणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल पालकांना अवगत करणे,  इत्यादी
४. सामाजिक: सर्वात वरिष्ठ वा जबाबदार शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनवणे, त्यांना चारित्र्यसंपन्न बनवणे, त्यांच्यात सामाजिक भान निर्माण करणे, देशभक्ती वाढविणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, एकोपा वाढवणे या जबाबदाऱ्याही मुख्याध्यापकावर असतात. 
५. तक्रार निवारण: विद्यार्थी, पालक, शिक्षक, इतर कर्मचारी सर्वांच्या तक्रारींचे निवारण मुख्याध्यापकाला करावे लागते. 
अशा प्रकारे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पद हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्या पदावर असणारी व्यक्ती अत्यंत कर्तव्यनिष्ठ असली पाहिजे. तिच्यावर असलेल्या वर उल्लेखित व अनुल्लेखित अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्यांचे तिला योग्य भान असायला हवे. तरच ती त्या पदाची प्रतिष्ठा आणि आपल्या शाळेची गुणवत्ता जपू शकेल.  

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणम्हणजे ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना शाळेत आणणे, सर्व मुलांना वयाच्या १४ वर्षापर्यंत शाळेत टिकविणे आणि सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण देणे होय.
प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम या संस्थेने महाराष्ट्रात खेडोपाडी, गरीबवस्तीत बालवाड्या उघडून सर्व मुलांना व्यवस्थितरित्या शिक्षण देते. एका वर्गात २० ते २५ विद्यार्थी संख्या असून आदिवासी भागात देखील या बालवाड्या चालू असतात. कोणत्याही जातीचा, भाषेचा, मुलगा वा मुलगी असो ते या शाळेत आलेच पाहिजे यासाठी संस्था प्रयत्नशील असते.
बालवाडीचे प्रशिक्षण ६ महिन्यांचे असून त्याचे प्रशिक्षण शुल्क रु.१,५००/-आहे . ज्या शिक्षकांनी बालवाडीचे प्रशिक्षण घेतलेले असते. ते शिक्षक आजूबाजूच्या परिसरात बालवाड्या सुरु करू शकतात. अशा प्रकारे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण समाजाच्या सर्व स्थरातील लोकांना उपलब्ध होऊ शकते.

प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षण
ज्या वयात काहीही कळत-समजत-उमजत नाही, त्याच काळात प्राथमिक शिक्षणाला  सुरुवात होते. लहान वयात शिक्षणाची आणि अभ्यासाची गोडी लागावी. हा पालकांचा उद्देश असतो. बालवयात मुलांना स्वातंत्र्य दिले, तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा अंदाज येतो.
प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी पर्यंतचे शिक्षण होय. शिक्षणाची पद्धत साधी, सरळ, सोपी असते. लहान मुलांचे हसणे, रडणे, गोड बोलणे, मस्ती करणे, खेळणे यांमधून शिक्षकांना विद्यार्थी घडवायचा असतो. ‘शिस्त’ लावण्याची मुख्य जबाबदारी शिक्षकांवर असते. महानगरपालिकेच्या आणि खासगी शाळांमधून प्राथमिक शिक्षणाची सर्वत्र उपलब्धता आहे. 
प्राथमिक शिक्षण ही विद्यार्थी शिक्षणाची पहिली पायरी आहे.

शिक्षण म्हणजे काय?

शिक्षण
शाळेत नवीनच प्रवेश घेतलेल्या मुलांमध्ये आपल्याला विविध वृत्ती, प्रवृत्ती दिसून येतात. काही मुले हुशार, काही चुणचुणीत, काही मंद गती, काही धीट तर काही अबोल असतात. काही मुले अनोळखी शिक्षकांशी लगेच गप्पा मारायला सुरुवात करतात. काही रडतात. हे त्यांच्यावरील संस्कार त्यांनी घरातून आपल्या आई वडीलांकडून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उचललेले असतात. 
मुलांनी नीट वळण लागावे यासाठी पालकांनी दररोज थोडातरी वेळ मुलांसाठी काढणे आवश्यक आहे. त्यांच्यासोबत गप्पा मारणे, खेळणे, चित्रं काढणे अशा साध्या साध्या गोष्टीही मेंदूची शक्ती वाढवू शकतात. त्यामुळे मुलांच्या शरीराबरोबर मानसिक विकासही होतो.वर्गामध्ये मराठी विषयात पहिला येणारा विध्यार्थी उत्तम भाषण करू शकत नाही, पण कमी गुण मिळवणारा विध्यार्थी मात्र उत्तम भाषण करू शकतो, हे कशामुळे घडते? कारण त्यांच्या त्या त्या क्षमता विकसित झालेल्या नसतात. तेव्हा शिक्षकाने सगळ्या मुलांना लिखाणाबरोबरच वाचन, संभाषण या क्षमताही अवगत झाल्या पाहिजेत इकडे लक्ष दिले पाहिजे. ही कौशल्ये प्रत्येक मुलाला प्राप्त होण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन केले पाहिजे.तज्ञांच्या मते शिक्षण म्हणजे बाहेरून ज्ञान आत घालण्याची किंवा वरून मुलांच्या मनावर लादण्याची गोष्ट नसून मुलांमधील सुप्त शक्तींचा विकास करण्याची प्रक्रिया असते.

शिक्षण व राष्ट्रीय विकास

राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचा विकास करण्यासाठी शाळेला पुढील उपक्रम करता येतील.अभ्यासक्रमातील विविध विषय शिकवतांना मनात प्रादेशिकता वाढण्याऐवजी राष्ट्रीयत्व कसे वाढेल हे पहावे. उदा. इतिहास हा विषय शिकवतांना एखाद्या प्रदेशातील राजाचे अथवा संताचे कार्य त्या प्रदेशापुरते मर्यादित नसून सर्व राष्ट्राला मार्गदर्शक कसे झाले हे सांगावे.विद्यार्थ्यांच्या मनात न्याय, समता, स्वातंत्र्य, व बंधुता ही मूल्ये निर्माण होतील असे उपक्रम शाळांनी आयोजीत करावे.
मराठी, हिंदी बरोबर संस्कृत भाषेच्या अध्यापानालाही शाळेतून महत्वाचे स्थान मिळावे. कारण त्या भाषेत प्राचीन संस्कृती वापर्म्पारा यांचे लेखन आहे. त्यांचाही विध्यार्थ्यांना परिचय होईल.भारतीय संस्कृती भाषा, धर्म, ऐतिहासिक पुरुष, समाजसुधारक इत्यादी संबंधीची छोटी छोटी पुस्तके विध्यार्थ्यांना पूरक वाचनासाठी द्यावीत. शाळेत राष्ट्राय गीतांचे गायन करावे. प्रत्येक शाळेत एनसीसी, एसीसी, स्काउट व गाईड असावे.
विद्यार्थ्याला देशातील तीर्थक्षेत्रे, प्रेक्षणीय स्थळे, औद्योगिक केंद्रे, ऐतिहासिक व राष्ट्रीय स्मारके दाखवावीत. त्यांना गिरण्या , कारखाने, बाजार व वस्तुंचे मॉल्स हे देखील दाखवता येतील.युनोस्कोने अनेक भाषांतील ग्रंथांची भाषांतरे केली आहेत. या ग्रंथाचाही विद्यार्थ्याला पूरक वाचन म्हणून उपयोग करून घेता येईल.

प्राचार्यांची जबाबदारी

प्राचार्यांची जबाबदारी

प्राचार्य कोणत्याही शिक्षणसंस्थेचा कणा असतो. शिक्षणसंस्थांचे नेतृत्व करणे, त्यांच्या वाटचालीसाठी योग्य मार्गदर्शन करणे आणि या शिक्षणसंस्थेतील एकूण व्यवस्थापनाचे समन्वय करण्याची जबाबदारी असते. शिक्षण व्यवस्थेचा गाभा असणाऱ्या अध्ययन आणि अध्यापनामध्ये सातत्याने विकास करणे आणि बदलत्या काळानुसार त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याची जबाबदारी प्राचार्याची असते. त्यामुळे एकूण शिक्षण संस्थांच्या वाटचालीमध्ये प्राचार्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.
शाळा किंवा महाविद्यालय या शैक्षणिक संस्था असल्या तरी, त्यामध्येही व्यवस्थापन आणि प्रशासकीय रचनेची आवश्यकता असतेच. या सर्व रचनेसाठी आणि त्याच्या कार्यक्षमतेसाठी प्राचार्य जबाबदार असतो. शाळांची संपूर्ण संघटनात्मक रचना, शैक्षणिक रचना यांची गरज, वेळेची उपलब्धता आणि त्या वर्षाची गरज यांचा विचार करून योग्य पद्धतीने आखणी करण्यासाठी प्राचार्याचा प्रयत्न असतो. तसेच, शाळेतील अभ्यासक्रमासाठी आणि अन्य कामांसाठी योग्य व्यक्तींमध्ये कामांची विभागणी करणे, त्यांच्या वेळांचे नियोजन करणे ही कामे प्राचार्याने करणे अपेक्षित असते. एकूणच, शैक्षणिक संस्थांच्या सुरळीत कामकाजासाठी प्राचार्य हाच जबाबदार असतो आणि त्याचेच स्थान सर्वोच्च असते.
शैक्षणिक संस्थेचे नेतृत्वच प्राचार्याकडे असल्यामुळे, या संस्थेचा दर्जा राखण्याची जबाबदारीही प्राचार्याची असते. सध्याच्या काळामध्ये एकूण परिस्थितीमध्ये वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे या बदलांचे भान ठेऊन आणि त्यातील अभ्यासक्रमातील गरज लक्षात घेऊन बदल घडवून आणणारा प्राचार्य हाच सर्वोत्तम असतो. त्यासाठी आवश्यक माहितीचे वाचन करणे, योग्य संस्थांच्या कार्यशाळा, अहवाल यांतून अधिकाधिक चांगल्या माहितीचे संकलन करणे आणि ही माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविणे, हे कामही प्राचार्याचे असते. तसेच, सध्या केंद्र आणि राज्य सरकारने शिक्षणातील बदलांसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे सरकारच्या या योजनाही अमलात आणण्यासाठी प्राचार्याच जबाबदार असतो. त्यामुळेच, एकूणच शिक्षण संस्थांच्या एकूण संस्थांच्या वाटचालीमध्ये प्राचार्यांची भूमिका महत्त्वाची असते.