Monday, 2 December 2013

शाळेची निवड

शाळेची निवड

मुले लहान असतानाच  त्यांना बालवाडीत घालायचं की प्राथमिक शाळेत? हा विचार प्रत्येक पालकांना करावा लागतो. नोकरी करणा-या पालकांना मात्र या आधीचा विचार करावा लागतो. आई आणि वडील दोघेही नोकरी करणारे असतील तर त्यांना आपल्या लहानग्यांना आधी पाळणाघरात आणि त्यानंतर पूर्व प्राथमिक शाळेत घालण्यावाचून दुसरा पर्यायच  नसतो. अशाप्रकारची व्यवस्था सरकारी पातळीवर होत नसल्याने दुर्दैवाने ती फार खर्चिक आहे. पण आपल्या आसपासच्या भागात चौकशी केली तर काही चर्चेस आणि खाजगी तसेच  सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चालवली जाणारी पाळणाघरे आणि पूर्व प्राथमिक शाळा यांची माहिती आपल्याला मिळू शकेल. इथे आपल्या पाल्याची उत्तम देखरेख, काळजी घेतली जाते ते ही अत्यंत कमी खर्चामध्ये. 
बहुतेक सरकारी शाळांना ‘अ’ दर्जा दिला जातो. पण आपल्या पाल्याने ‘अ’ असलेल्या शाळेतच जावे ही कोणत्याही पालकाची अपेक्षा असते. काही सरकारी शाळांची कामगिरी एखाद्या विभागात चांगली असते. उदा. काही शाळा  आपल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही क्रीडा प्रकारात उत्तम असतात तर काही शाळा कलेच्या क्षेत्रात नावाजलेल्या असतात. बरेच पालक आपल्या पाल्यासाठी शाळा निवडताना  घरापासून जवळची आणि सोयीस्कर शाळा निवडतात. तरीही उत्कृष्ट शाळेचा त्यांचा शोध सुरूच असतो. काही शाळाही शाळेत प्रवेश देतांना जवळच्या भागात राहणा-या विद्यार्थ्यांना प्राधान्य देतात. मात्र तुमच्या पाल्याने चांगल्या शाळेत, मग ती दूर असली तरी तिथे जावे असे वाटत असेल तर ‘अ’ दर्जा असलेल्या शाळेत घालणे हाच उत्तम पर्याय असू शकेल.
स्वतंत्र किंवा खाजगी शाळा फार खर्चिक असल्या तरी त्यांच्याकडे चांगल्या सुविधा उपलब्ध असतात. हा विचार तुमचा पक्का झाला की आपल्या मुलासाठी हवी तशी शाळा शोधायला सुरुवात करा.

आश्रम शाळा

महाराष्ट्रातील अनेक डोंगराळ व दुर्गम भागातील मुलांना शिक्षण उपलब्ध होत नाही. शाळा दूर असल्याने त्यांना रोज ये-जा करणे कठीण होते.  अश्या दुर्गम व  डोंगराळ भागातील, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने आश्रम शाळा बांधल्या आहेत. अश्या भागातील लोकांचा मुलभूत विकास होण्यासाठी आश्रम शाळा या मूळ केंद्रस्थानी  ठेवण्यात आल्या आहेत. जिथे इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. परंतु इथे येणारया विद्यार्थ्यांना काही  अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. हे विद्यार्थी आदिवासीच असावे. विद्यार्थ्यांनी वयाची पाच वर्ष पूर्ण  केल्यानंतरच इथे  प्रवेश दिला जातो.  प्रवेशाच्या वेळी जातीचा दाखला आणि जन्मतारखेचा दाखला त्यासोबतच आई वडिलांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इयत्ता पहिलीत  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांव्यातीरिक्त विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला द्यावा लागेल. 
परंतु शिक्षण हक्क कायद्यातील रतुदींनुसार ही  अट आता ग्राह्य धरता  येणार  नाही. या आश्रम शाळेत मुला आणि मुलींचे प्रमाण पन्नास पन्नास टक्के असणे अपेक्षित असते. याशिवाय दारिद्र्य रेषेखालील आदिवासींना यात  प्राधान्य देण्यात येते. अपंग विद्यार्थ्यांसाठी तीन  टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतात.  इथे प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला निवास, भोजन, गणवेश, अंथरून, पांघरून, पुस्तक व इतर  लेखन साहित्य इत्यादी  सुविधा शासनाकडून मोफत पुरवण्यात येतात.  
शासकीय  आश्रम शाळांशिवाय इतर अनेक खासगी संस्थांकडून देखील आश्रम शाळा चालवण्यात येतात.  त्या   संस्थांकडूनच  त्यांना  अर्थसाह्य  केले जाते. काही  खासगी आश्रम शाळांत देखील मोफत शिक्षण व सर्व सुविधा पुरवण्यात येतात. तर काही आश्रम शाळा अत्यंत  नाममात्र  शुल्क  आकारतात. याशिवाय स्वेच्छेने आश्रम चालवणाऱ्या संस्थांना  सरकारकडून  अर्थसाह्य देखील मिळते.  यामध्ये  शासनाच्या  केंद्र  पुरसृत  सरकारी शाळा देखील आहेत. अनुदानित  आणि शासकीय आश्रम शाळा प्रोत्साहनपर  बक्षीस योजनाही अस्तित्वात आहे. ज्या आश्रम शाळा उत्तम कामगिरी करतात अशा शाळांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळण्याची योजना आहे. पुण्यात आंबेगाव आणि  भोर येथे शासकीय  आश्रम आहेत.

रात्र शाळा

रात्र शाळा ही संकल्पना अस्तित्वात येण्याचे कारण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे काम  करत इच्छा आहे  अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. अनेक लोकांचा गैरसमज असतो  की रात्र शाळेची वेळ ही मध्यरात्रीची रात्रीची असते. परंतु ही वेळ संध्याकाळी  सहा ते रात्री साधारण दहा- आकारा पर्यंत असते. गरीब विद्यार्थ्यांना काम करता करता शिकता यावे  हाच या रात्र शाळांमागील मुख्य हेतू आहे.  रात्र शाळांबरोबरच रात्र महाविद्यालये देखील आहेत. रात्र शाळांपेक्षा रात्र महाविद्यालयांना चांगला प्रतिसाद मिळतो. रात्र शाळांची वेळ वगळता संपूर्ण शिक्षण हे इतर शाळांप्रमाणेच असते. शिक्षक, शिक्षण, अभ्यासक्रम, परीक्षापद्धती या सर्व गोष्टी इतर शाळांप्रमाणेच असतात.  वयाच्या चौदा वर्षापर्यंतचे शिक्षण प्रत्येक  विद्यर्थ्याला मोफत असल्यामुळे शासकीय रात्र शाळेत वयाच्या चौदा वर्षापर्यंतचे शिक्षण देखील मोफत असते.  अनेक रात्र शाळा या खासगी संस्थांमार्फत चालवल्या जातात. त्यातील अनेक संस्थांना सरकारी अनुदानही मिळते.
रात्र शाळा  व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेत गुणांची अट मात्र नसते.विद्यार्थ्यांची गरज पाहून त्याला प्रवेश दिला जातो.  या शाळांतही मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी आरक्षण देण्यात येते.  आणि इथेही विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के हजेरी भरणे आवश्यक आहे. परंतु काही   विद्यार्थ्यांना ही हजेरी भरणे शक्य नसेल तर त्यांच्या अडचणी समजून घेऊन तशी सवलतही देण्यात येते. शाळा पातळीवर मुलींची संख्या  कमी असली तरीही महाविद्यालयीन पातळीवर मुलींचा चागला प्रतिसाद असतो. एखाद्या विद्यार्थ्याला  महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला काम करत असल्याचा पुरावा सादर करण्याची सक्ती नसते. एखादा विद्यार्थी काम करत नसेल तरीही त्याला रात्र शाळेत प्रवेश घेण्याची परवानगी असते. रात्र शाळेमुळे मुलांना स्वावलंबी बनून स्वतःचे शिक्षण स्वतः पूर्ण करता येते. पुण्यातही अनेक रात्र शाळा आहेत. सरस्वती विद्या मंदिर, अत्रे रात्र शाळा, अबेदा इनामदार रात्र महाविद्यालय, एमआयटी रात्र महाविद्यालय आहेत.

शाळा निवडीचे निकष

आपल्या मुलासाठी शाळा निवडताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. मग तुमचा पाल्य पहिल्यांदाच शाळेत जाणार असो की त्याची सुरु असलेली शाळा बदलायची असो. शाळा निवडीचे निर्णय अत्यंत महत्त्वाचे असतात, पण तुमच्यासाठी असलेले चांगले पर्याय कोणते? 
वर्ग संख्यावर्गामध्ये असलेल्या पटसंख्येवरही तुमचा पाल्य कसा अभ्यास करेल हे अवलंबून असते. बहुतेक सरकारी शाळातील वर्गांची पटसंख्या मोठी असते. पण तुम्ही जरा शोध घेतला तर लहान पटसंख्या असलेल्या वर्गांच्या शाळाही तुम्हाला नक्कीच सापडतील. स्वतंत्र आणि खाजगी शाळांमध्ये असे लहान वर्ग आपल्याला दिसतात. 
शाळेची इमारतकाही मुले मोठ्या शाळेत चांगली रमतात. तिथे त्यांच्या बरोबर खेळणारी अनेक मुले असतात. शिवाय वर्गही बरेच असतात. लहान शाळांमध्ये वर्गही कमी असतात शिवाय मुलं कमी असल्यामुळे शिक्षक आणि मुलांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. सरकारी शाळा या आकाराने मोठया असतात, त्यांचे वर्गही मोठे असतात. आणि तिथेसुद्धा   समर्पित आणि मेहनती शिक्षक असतात. हे शिक्षक तुमच्या पाल्याकडे वैयक्तिक रित्या लक्ष देऊ शकतात, ज्याची मुलांना फार गरज असते.
शाळेचे ठिकाणअनेक कुटुंबाना जवळच्या आणि सोयीस्कर शाळा हव्या असतात. परंतु शाळेतून येत जाताना मुलाच्या सुरक्षिततेचीही हमी आपल्याला हवी असते. शिवाय या ठिकाणी मुलासाठी आवश्यक असलेले ग्रंथालय, स्वीमिंग पूल अशा सोयी आहेत का ते ही आपण पाहतोच.
विविधताअनेक पालकांना शाळेमध्ये सर्व जाती, धर्म, वर्ग आणि वर्णाच्या मुलांचा समावेश असावा असं वाटत असतं. सांस्कृतिक विविधतेची ओळख आपल्या मुलाला करून देण्यासाठी आपल्या समाजाच्या बाहेर डोकावणं अत्यंत आवश्यक असतं. 
शाळेची फीसरकारी शाळांमध्ये सरकारी नियमांप्रमाणेच फी आकारली जाते. पण जी फी जर तुम्ही नाही देऊ शकला तरी तुमच्या मुलाला डावललं जात नाही. शाळांमध्ये मुलींसाठी मोफत शिक्षणाची सोय असते तर मुलांसाठी अभ्यासक्रमाची पुस्तकेही दिली जातात. प्राथमिक शिक्षण हा त्याचा अधिकारच आहे. तेच जर तुम्ही स्थानिक, खाजगी शाळांमध्ये पाहिलं तर फीच्या व्यतिरिक्त पुस्तकं, वह्या, गणवेष त्याचप्रमाणे इतर वस्तू यांच्यावर लादलेली छुपी फी आपल्याला दिसते. काही शाळांमध्ये सवलतीही दिल्या जातात. उदा. भावंडांच्या फीमध्ये सवलत मिळते. स्वतंत्र-खाजगी शाळा मात्र फार मोठी रक्कम फीच्या रुपाने आकारतात. त्यात कोणतीही सवलत दिली जात नाही. पण तिथे होतकरू विद्यार्थांसाठी अनेक ग्रँट आणि शिष्यवृत्त्या दिल्या जातात.

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण आणि ज्ञानेंद्रियांचा विकास

विद्यार्थ्यांचा सर्वांगिण आणि ज्ञानेंद्रियांचा विकास

विद्यार्थ्यांचा विकास
मुलांच्या वाढीचे आणि विकासाचे टप्पे योग्य वेळेत, योग्य वयात पूर्ण होणे महत्वाचे असते. तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्यवस्थित प्रकारे होतो. शारीरिक, भावनिक, सामाजिक, बौद्धिक, भाषिक विकास सर्वांगिण विकासाच्या अंतर्गत केला जातो. मुलांच्या  विकासात महत्वाची भूमिका आहाराची असते. सकस आहाराने मुले निरोगी राहून शारीरिकरित्या सुदृढ बनतात.
ज्ञानेंद्रियांचा विकास
डोळेडोळ्याने विद्यार्थी वस्तू ओळखतात, दोन वस्तूंमधील फरक समजतात,विविध रंगाच्या, आकाराच्या, उंचीच्या वस्तू दाखवणे, अशा अनेक प्रकारे शिक्षक त्यांना अनुभव देतात.
नाकवास घेण्यासाठी आणि श्वासोच्छवासासाठी नाकाचा उपयोग होतो. सुगंध आणि दुर्गंध यांतील फरक दाखवणे. फुलांचा आणि अत्तराचा वास घेऊन तो मुलांना  ओळखण्यास सांगणे.
काननिरनिराळे आवाज ऐकणे, सुरेल आवाज, कर्कश आवाज, माणसांच्या आवाजातील फरक दाखवून देणे. पाण्याचा, वाहनाचा, प्राण्यांचा असे अनेक आवाज ओळखण्यास सांगणे. 
जीभजीभेवरील ज्ञानतंतूमुळे माणसाला गोड, खारट, आंबट, कडू,आदी चवींचे ज्ञान होते. जीभेवरील ज्ञानतंतूमुळे संवेदना निर्माण होऊन चव कळते. विद्यार्थ्यांना विविध पदार्थ चाखावयास देऊन त्यांना चवींची ओळख आणि फरक समजावून सांगू शकतो.
त्वचात्वचेच्यास्पर्शातून संवेदना कळतात. विविध वस्तूंचे स्पर्श अनुभवण्यास देऊन उदा.  गरम, थंड, ओला, सुका, खरखरीत, गुळगुळीत असे अनेक स्पर्शअनुभव विद्यार्थ्यांना आपण देऊ शकतो.
अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होते.  

वाचन

वाचन

वाचन पत्रिका : वाचन करताना महत्वाच्या काही गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.
पूर्व तयारी -
  • काय वाचणार ते समजून घ्या.
  • जे वाचणारे त्याविषयीचे पूर्वज्ञान आहे का, पाहा.
  • प्रश्न विचारा ( स्वत:ला , आपल्या मित्रमैत्रिणीला )
वाचताना -
  • वाचनाचा तुमचा हेतु स्पष्ट हवा. (माहिती मिळविण्यासाठी, मनोरंजांनासाठी, ज्ञान वाढविण्यासाठी)
  • वाचताना लक्षपूर्वक वाचा.
  • वाचताना जोरात वाचू नका. जे वाचत आहात, ते कठीण आहे की सोपे आहे हे समजून घेऊन वाचा. त्यामुळे मोठयाने वाचताना अडखळायला होणार नाही.
  • जे वाचत आहात त्याविषयी पूर्वी असचं काही वाचल्याचं आठवत का पाहा. किंवा त्याची मदत होते का पाहा.
वाचल्यानंतर -
  • आवश्यक तिथे पुन्हा वाचा.
  • आठवा आणि जे वाचले ते क्रमवार स्वतच्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करा.
  • जे वाचले त्याचा आणि तुम्ही आजवर घेतलेल्या अनुभवांचा संबध आहे का ?
  • लेखकाने कसे लिहिले आहे असे तुम्हाला वाटते ? उदा. लेखकाने शब्दरचना, परिच्छेद, भाषेचा वापर यावर तुम्ही तुमच्या शब्दात टिपणी तयार करा.
वाचन वाढवल्याने तुमचा शब्दसंग्रह वाढेल आणि वाचनाने विचारांना योग्य दिशा मिळेल. हे नेहमी लक्षात ठेवा .

वर्तमानपत्राद्वारे मुलांचा भाषा विकास

वर्तमानपत्राद्वारे मुलांचा भाषा विकास

मुलांना शाळेतील पुस्तकांच्या वाचनाबरोबर अवांतर वाचन देखील खूप आवडत असते.लहान वयात गोष्टी,गाणी,कविता ऐकायची आणि वाचायची सवय मुलांना लावली तर मुलांच्या भाषेचा विकास सहज व सोप्या पद्धतीने होऊ शकतो. मुलांमध्ये वाचनाचे कौशल्य विकसीत करण्यासाठी अवांतर वाचनाची सवय ही वर्तमानपत्राच्या वाचनातून विकसीत करणे ही फायदेशीर गोष्ट ठरू शकते.
श्री.विकास काटकर यांनी सोलापूर येथील आपल्या शाळेत कार्यानुभवाच्या तासाला मुलांच्या मदतीने ज्ञानगंगा नावाचा उपक्रम राबवला.यात प्रामुख्याने वर्तमानपत्राचे वाचन हा महत्वाचा कार्यक्रम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडून मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासली.शाळेत येणाऱ्या वर्तमानपत्रामधील महत्वाच्या विषयांची कात्रणे काढून मुलांच्या मदतीने कार्यानुभवाच्या तासाला ही कात्रणे त्यांनी एका वहीत चिकटवून घेतली.यातून एक छोटेसे वाचनालय तयार झाले व मुले पण आपल्या घरी येणारी वर्तमानपत्रे काळजीने वाचू लागली. त्यात त्यांना चांगली माहिती मिळाली तसेच त्यातील महत्वाची कात्रणे काढून शाळेतल्या वहीत चिकटवू लागली.या वर्तमानपत्रात आलेल्या कथांमधून काही कथा वाचून पाठ करून परीपाठाच्या वेळी सांगू लागली. त्यातून त्यांचा वाचनाचा छंदही वाढला.मुलांमध्ये मनोरंजनातून भाषाविकास करण्यासाठी काटकरांनी विनोद स्पर्धा आयोजित केली. वर्तमानपत्रातून आलेले विनोद मुलेया स्पर्धेत सांगू लागली.
वर्तमानपत्रातील सांगा पाहू? ओळखा पाहू?जरा डोके चालवा अशा कोड्यांच्या वापराने  मुलांचे सामान्यज्ञान वाढते तर आरोग्य या सदराचा उपयोग शारिरीक शिक्षण, आरोग्य, आहार यासाठी खूप चांगल्या प्रकारे होतो.दिनविशेष हे सदर वर्षभरातील थोर पुरुषांची जयंती,पुण्यतिथी समजून कार्यक्रम साजरा करायला खूप उपयोगी पडते.संस्कारधन, विज्ञानसंस्कार,थोरांचे बोल याचा देखील चांगला फायदा होतो.शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसलेल्या मुलांना देखील या उपक्रमाचा लाभ चांगल्या प्रकारे होतो. शब्दकोडी सोडवल्याने शब्दसंपत्ती व सामान्यज्ञानात भर पडते.अशा प्रकारे वर्तमानपत्राद्वारे मुलांचा हसतखेळत भाषिक विकास सहज सुलभ साधता येतो.

राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना

राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना

शिष्यवृत्ती
शिक्षणापासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना लागू आहे.
शिष्यवृत्तीचे स्वरूप 
  • इ.९ वी व इ.१० वी मध्ये शिकणाऱ्या ग्रामीण भागातील निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना दरमहा रु. २५०/-
  • इ. ११ वी, इ. १२ वी मध्ये शिकणाऱ्या निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना दरमहा रु. ३००/-
  • पदवी शिक्षण घेणाऱ्या (बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., इ.)निवडक गुणवंत विद्यार्थ्यांना रु. ५००/- प्रतिमहा.
  • पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत निवडक विद्यार्थ्यांना रु. ७५०/-दरमहा.
  • एकूण शिष्यवृत्त्या - इ. ९ वी व इ.१० वी साठी प्रत्येक तालुक्यास दोन .
  • इ. ११ वी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत राज्य शासनाच्या गुणवत्ता यादीनुसार .
पात्रता 
  • विद्यार्थी इ. ९ वी व इ.१० वी मध्ये शासकीय शाळेमध्ये शिकणारा असावा.
  • इ.१० वी नंतर पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी शास्त्र, वाणिज्य शाखेसाठी ६० टक्केपेक्षा जास्त व ह्युमैनिटी शाखेसाठी ५५ टक्केपेक्षा जास्त.
  • इतर कोणतेही गुणवत्ता शिष्यवृत्ती अनुदान घेतलेले नसावे.
  • मान्यताप्राप्त संस्थेमध्ये शिक्षण घेत असावा.
  • कौटुंबिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रिया 
  • इ. ८ वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तालुकानिहाय गुणवत्ता यादीतील प्रत्येक तालुक्यातील पहिले दोन विद्यार्थी.
  • इ. १० वी नंतरच्या शिक्षणासाठी राज्य सरकारने तयार केलेल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थी.

मुलाला शाळेत पाठवण्याची पूर्वतयारी

मुलाला शाळेत पाठवण्याची पूर्वतयारी

मुलाला शाळेत पाठवण्याची पूर्वतयारी
मुलाची शाळेत जाण्याची तयारी त्याच्या अगदी लहान वयातच करावी लागते. काही गोष्टींवर अधिक लक्ष देऊन मुलाची ही तयारी आपण करू शकता.
सामान्य ज्ञानआपल्या मुलाला स्वत:चे पूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वाढदिवस या गोष्टी व्यवस्थित शिकवा. जेंव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेरच्या जगाविषयी काही प्रश्न विचारतात तेंव्हा त्या प्रश्नांची शक्य तेवढी योग्य उत्तरे द्या. किंवा त्या उत्तरांचा शोध घ्यायला त्यांना अन्यप्रकारे मदत करा. 
स्वयंसहायता तुमच्या मुलाला स्वत:चे कपडे घालणे आणि बदलणे ही जमले पाहिजे. त्याला झिप, बटन्स, प्रेस बटन्स, वेल क्रो यांचा वापरही कळायला हवा. शाळेचे बूट ही त्यांचे त्यांनाच घालता आले पाहिजेत. आपले नाक साफ करणे आणि स्वच्छ्तालयात स्वत:हून जाणे या गोष्टीही त्याने स्वत:च केल्या पाहिजेत. 
त्यांच्या वस्तूंना नावे द्यातुमच्या मुलाच्या वस्तू, कपडे यांना व्यवस्थित खुणा करा. या खुणा ओळखून त्यांची जागा त्यांना कळू दे. याचा फायदा त्यांना आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवण्यासाठी होईल. त्याला आपल्या वस्तूंची जबाबदारी ओळखायला शिकवा. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा तर वाचतोच शिवाय तुमची मुलं ब-याच चांगल्या सवयी शिकू शकतात. 
मुलांचा आहारमुलांचा सकाळचा नाश्ता आणि त्यांना शाळेत घेऊन जाण्यासाठी दिला गेलेला सकस आहार (टिफिन) यामुळे मुलांचा अभ्यास उत्तम होत असतो. जर तुमचा मुलगा जेवायला घरी येत असेल तर  गव्हाच्या चपाती, सँडवीच आणि एका फळाचा तुकडा त्याच्या साठी पुरेसा असतो. जर त्याची शाळा दुपारची असेल किंवा दुपारचे जेवण मिळणे अशक्य असेल अश्याप्रकारे शाळेची वेळ असेल तर एक ज्यादा सँडवीच त्याला द्यावे. त्यात थोडे दाणे, गाजर आणि काही भाज्या घालाव्यात. ‍पॉपकॉर्न, चिप्स आणि कोल्डड्रिंक्स पेक्षा चपाती, ‌‍‌सँडवीच आणि फळांचा रस हे किफायतशीर आणि आरोग्यदायीही असेल. 

शाळापूर्व तयारी

शाळापूर्व तयारीमध्ये सर्वप्रथम शिक्षक आणि पालक यांचा संपर्क होणे महत्वाचे असते. ज्या वस्तीत किंवा परिसरात शाळा सुरु करायची आहे तेथे शिक्षक जाऊन पालकसभा घेतात. पालकांच्या सोयीनुसार आणि चर्चेतून विचार-विनिमय करून शाळेची जागा, वेळ, शालेय शुल्क ठरवले जाते. जे पालक शुल्क भरू शकत नाही, अशांसाठी परिसरातील देणगीदारांची व्यवस्था करून त्याची जबाबदारी एका पालकावर सोपवली जाते. त्यामुळे शाळेविषयी पालकांमध्ये जागरूकता निर्माण होते. बालवाडीसाठी एखाद्या मंडळाची जागा किंवा सरपंचाचे कार्यालय दिले जाते.
वस्तीतील पालकांचे शिक्षकांच्या शिक्षण पद्धतीवर लक्ष असून ते सतत जागरूक असतात. शिक्षकांच्या सूचना, अडचणी यांचे पालन पालक नेहमी करतात. शिक्षक पालकांना शाळापूर्व तयारीबद्दल मार्गदर्शन करतात.सामान्य ज्ञान आणि स्वयंसहायतेच्या पलीकडे आणखी काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या पाल्याने शिकणं आवश्यक आहे. 
  • मानसिक आणि सामाजिक विकास
  • निरीक्षण क्षमतेचा विकास (ऐकणं आणि पाहणं) 
  • शरीराची ओळख
  • शरीर विकास
  • संवाद आणि भाषा कौशल्य 
  • अंक ओळखणं
  • संकल्पना तयार करणं
  •  

    अंकांची ओळख

    अंकांची ओळख
    अंक ओळखणे ही रोजच्या आयुष्यात अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, शाळेत जाऊ लागे पर्यंत तुमच्या मुलाने ती शिकणं गरजेचं आहे, निदान पुढील संकल्पना त्याला माहीत आसायला हव्यात. 
    आकडेमोड : २० पर्यंत आकडे त्याला बोलता आले पाहिजेत. पहिला, दुसरा, तिसरा असे क्रमांक त्याला कळले पाहिजेत. 
    1. लहान मोठया संख्या त्याला कळल्या पाहिजेत. 
    2. संख्या आणि वस्तू यांचा मेळ घालता आला पाहिजे. उदा. ५ या संख्येपुढे ५ मणी त्याला ठेवता आल्या पाहिजेत, 
    3. आकारानुसार एखादी ओळ पूर्ण करता आली पाहिजे, 
    वर्गीकरण : समान आणि विषम या दोन निकषांवर त्याला वर्गीकरण जमले पाहिजे, तुम्ही अशी मदत करू शकाल : 
    1.  त्यांच्या सोबत मोजणी करा. उदा. शेतात किती झाडं आहेत? किती मुलं खेळत आहेत? किती काटे चमचे टेबलावर आहेत?
    2.  १ ते २० (किंवा ५० किंवा १००) आकडे मोजा आणि त्यांच्या या मोजण्याचं कौतुक आणि आश्चर्य व्यक्त करा. 
    3.  लिहिलेले आकडे ओळखायला सांगा.
    4.  समोर ठेवलेल्या वस्तूंमध्ये पहिली, दुसरी, पाचवी, आठवी वस्तू कोणती ते विचारा.
    5.  कपडे घडया करून ठेवताना मॅचिंग मोजे काढून एकूण किती जोडया मोजे आहेत ते त्याला विचारा. 
    6.  बेरजा आणि वजाबाक्या शिकवा. उदा. एक बिस्कीट असताना आणखी एक द्या, आता किती बिस्कीटं झाली? ५ चॉकलेटस असताना ३ खाल्ली, आता किती  उरली? असे प्रश्न विचारा. 
    7.  मण्यांची एखादी माळ किंवा चित्र तयार करा आणि तशीच माळ किंवा चित्र मुलास तयार करायला सांगा.

    निरीक्षण क्षमतेचा विकास

    पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींचा अर्थ तुमच्या मुलाचा मेंदू किती चांगल्या प्रकारे लावतो यालाच निरीक्षण क्षमतेचा विकास म्हणतात. 
    ऐकण्याची क्षमता वाढवण्यासाठी 
    1. तुम्ही तुमच्या मुलासोबत वेळ घालवताना डोळे बंद करा आणि आजूबाजूचे आवाज कोण जास्त ओळखतो हा खेळ खेळा. 
    2. बालगीतं स्वत: म्हणून त्यानाही गायला शिकवा.
    3. वस्तू मोजण्याचा खेळ खेळा. (हे अंकांसाठी आवश्यक आहे.) 
    4. यमक जुळवण्याचा खेळ खेळा. उदा. कॅट – बॅट, हाऊस – माउस. तसेच मराठी शब्द- घर-वर, पत्र-छत्र. इत्यादी. 
    बघण्याची क्षमता वाढवण्यासाठी 
    1. एखादं चित्र बघून त्यातल्या गोष्टी ओळखणे.
    2. स्मरणशक्तीचे खेळ खेळणे. यात त्याच्यासमोर काही वस्तू ठेउन त्या मुलाला पाहायला सांगा. त्यातील एकेक वस्तू समोर ठेउन ती कोणती वस्तू आहे असे त्याला विचारा. जास्तीत जास्त किती वस्तू तो सांगतो हे पहा. 
    3. कोडी तयार करा आणि सोडवायला सांगा.
    4. मॅचिंग चपला, सॉक्स निवडणे, वस्तू आपापल्या जागेवर ठेवणे अशा कामाच्या जोडया लावा. या जोडया बटन, खडे, पैसे यांच्याही तुम्ही लाऊ शकता. बॉल किंवा थाळी फेकणे आणि पकडणे या क्रियाही मुलांना मजेशीर वाटतात आणि त्यातून मुलांना शिकताही येतं.

    भाषा आणि संवाद कौशल्य

    तुमचा पाल्य हा एक तर बडबडया किंवा शांत राहून विचार करणारा असू शकेल, संवाद साधण्यासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, त्यांच्या भाषेचा विकास आपण असा साधू शकाल :
    1. त्यांच्याशी बोबडया भाषेत बोलणं टाळा. बोलताना स्पष्ट शब्दोच्चार, शुद्ध नावांचा उच्चार करा. 
    2. त्यांनी दिवसभरात काय काय केलं हे त्यांच्या कडून बोलून घ्या. ते लक्षपुर्वक ऐका.
    3. बालगीतं तुम्ही त्यांच्या सोबतच म्हणा. 
    4. एखादी गोष्ट तुम्ही त्यांना सांगा, एखादी त्यांच्याकडून ऐकून घ्या. झाड छोटं आहे की उंच ? उशी मऊ आहे की कडक ? पाणी गरम आहे की थंड असे प्रश्न त्यांना विचारा. 
    5. एखादी कथा त्यांना सांगा मात्र तिचा शेवट काय असेल हे त्यांनाच विचारून तसं चित्र उभं करायला सांगा.

    मानसिक आणि सामाजिक विकास

    आपल्या मुलाला स्वत:च्या आणि इतरांच्या भावना जपायला शिकवा. काही महत्त्वाच्या टिप्स पुढीलप्रमाणे
    तुमच्या मुलाला स्वतंत्रपणे काम करू द्या. शाळेची सुरुवात होईपर्यंत त्याला कपडे निवडणे, कपडे घालणे, दात घासणे, बुट घालणे, टाय लावणे या गोष्टी जमायला हव्यात. त्यांची कामं तुम्ही स्वत: करण्यासाठी धडपडू नका. ते सोपं वाटत असेल तरीही नको. त्याचं ऐका. त्यांच्या आवडीच्या गोष्टी समजून घ्या. विविध गोष्टीवर त्यांचीही मतं घ्या. रात्रीच्या जेवणासाठी दोन पर्याय ठेवा. आणि त्यातला एक त्यांना निवडू द्या. यावरून त्यांच्या शब्दालाही किंमत, आदर असल्याचं त्यांना जाणवेल. त्यांच्या कृतीसाठी त्यांनाच जबाबदार धरा.

    जेंव्हा तुमचं मुल काही चुकीचं वागेल तेंव्हा त्यांना स्वत:लाच त्याची कबुली देता आली पाहिजे. पण अशा प्रकारच्या चुका तुम्हाला किंवा त्यांनाही आवडत नाहीत हे त्यांच्या मनात रुजवा. उदा. ‘तू फार खोडकर मुलगी आहेस’ असं म्हणण्या ऐवजी ‘तू जे केलंस ते अत्यंत खोडकर होतं’ असं म्हणा. मुलाच्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करा. त्याने काढलेली चित्रे आणि तयार केलेल्या वस्तू घरात लावा. त्याने खेळात किंवा अन्य कोणत्याही केलेल्या उत्तम कामगिरीविषयी नातेवाईकांना, मित्रांना फोन करून कळवा. चांगल्या कामामुळे किंवा तशा प्रयत्नामुळे आपले पालक खुश होत असल्याचं त्यांचा लक्षात येऊ द्या. 
    • बघण्या, ऐकण्याची क्षमता 
    • शरीराची माहिती 
    • शारीरिक विकास 
    • संवाद आणि भाषा कौशल्य 
    • अंक ओळखणे 
    • संकल्पना तयार करणे.

    शरीराची ओळख

    आपल्या शरीराची माहिती आणि त्याची हालचाल कशी असते हे प्रत्येक मुलाला माहित असणं आवश्यक आहे.
    • तुम्ही तुमच्या मुलाला त्याच्या शरीराचं चित्र तयार करायला पुढीलप्रमाणे मदत करू शकता. 
    • आरशासमोर उभं राहून ‘हा आईचा कोपर, हा सोनूचा कोपर ’ किंवा ‘हा बाबांचा गुडघा, हा छकुलीचा गुडघा’ अशा प्रकारे शरीराच्या अवयवांची माहिती देऊ शकता. 
    • त्याचे डोळे बंद करून त्याच्या अवयवांना स्पर्श करून तुम्ही कुठे बोट ठेवलं आहे ते ओळखायला सांगा. 
    • मुलाला स्वत:चं किंवा इतरांचं चित्र काढायला सांगा. आधी त्याच्या चित्राचं कौतुक करा. मग हळूच ‘याला नाक असतं तर श्वास घ्यायला सोपं झालं असतं नाही का ?’ किंवा ‘याला पाय असते तर हा चालू शकला असता असं नाही वाटत? अशा प्रश्नांनी त्याला थोडं चुचकारावं.
    • आरशाचा खेळ : आरशात प्रतिबिंब दिसतं तसं तुम्ही आणि मुल समोरासमोर उभे रहा. आणि तुम्ही हात पाय हलवले की त्याला आरशाप्रमाणे प्रतिसाद द्यायला सांगा. अशा प्रकारे सर्व अवयवांचे वेगवेगळे प्रकार करा, याने तुमच्या मुलाला स्वत:च्या शरीराची चांगली ओळख होईल.
    • याचप्रमाणे शरीराच्या हवेतल्या हालचाली कशा असतात ते ही आपण शिकवू शकाल. त्याला पुढे, मागे, आजूबाजूला चालण्यास, उडया मारण्यास सांगा. वर, खाली, बाजूला या गोष्टी शिकवण्यासाठी तुम्ही टेबलावरच्या काटा चमच्याचा वापर करू शकता. हे काटे चमचे सरळ रेषेत लावले तर त्यांना दिशाही दाखवता येतील.

    शारीरिक विकास

    हा त्याला वर्गात नीट बसण्यासाठी, अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अगदी हातात पेन्सिल पकडण्यासाठीही आवश्यक आहे, 
    • मुलाचा शरीरातील स्नायूंचे नियंत्रण (ग्रॉस मोटर स्कील) : मोठया अवयवांचा वापर आणि हालचाली : शरीरातील मोठया स्नायुंकडून नियंत्रित होणा-या हालचाली या मोठया हालचाली असतात. यामध्ये चालणे, धावणे, उडया मारणे या हालचाली येतात, या मोठया हालचालींचा विकास करण्यास आपण पुढील प्रमाणे शिकवू शकता.
    • मुलासोबत खेळा. बॉल किंवा थाळी फेकण्या आणि झेलण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. आधाराशिवाय पायाच्या अंगठयावर उभं राहून त्यांना समतोल साधायला शिकवा. कमी उंचीच्या भिंतीवरून किंवा कठडयावरून किंवा विटांच्या थरावरून त्यांना चालण्यास सांगा. असं सरळ चालणं त्याला जमलं की मागे चालायला सांगा. त्यानंतर चालताना बॉल झेलायला सांगा. मुलाबरोबर या गोष्टी उडया मारताना, दोरीच्या उडया मारताना, गोल फिरतानाही करू शकता. 
    • लहान अवयवांच्या हालचाली (फाईन मोटर स्कील) : या हालचाली लहान स्नायुनी नियंत्रित होतात. यात पेन्सिल सारखी लहान वस्तू पकडण्याच्या क्रियेचा समावेश होतो, या हालचालींच्या विकासाकरता पुढील प्रयत्न करू शकता, 
    • खेळण्याच्या मातीने लहान गोळे तयार करून ते अंगठा आणि इतर बोटांनी पकडायला सांगा. लहान कात्रीने वेगवेगळ्या आकारातील चित्रे कापायला सांगा. वर्तमान पत्रांचे किंवा टिश्यू पेपरचे तुकडे कापून किंवा फाडून त्याचे गोळे तयार करा, मणी किंवा स्ट्रॉची माळ धाग्यात ओवायला सांगा. 
    • चित्र काढा आणि ती रंगवा. 

    संकल्पना निर्मिती

    शाळेत जाण्याआधी तुमच्या मुलास/मुलीस काही संकल्पना माहीत असणं आवश्यक आहे. त्यातील मुख्य पाच पुढीलप्रमाणे :
    रंगलाल, पिवळा, निळा हे प्राथमिक रंग, नारंगी, हिरवा, जांभळा हे दुय्यम रंग मुलास ओळखता येऊ दे. दुय्यम रंग हे प्राथमिक रंगांच्या मिश्रणातून तयार होतात हे त्याला कळू दे. उदा. लाल+पिवळा= नारिंगी, पिवळा+निळा = हिरवा, लाल+निळा = जांभळा. 
    आकारगोल, चौकोन, त्रिकोण, चौरस, पंचकोन, अंडाकृती, अर्धगोल, अष्टकोन, चांदणी हे आकार मुलाला ओळखता येऊ दे. रस्त्याने चालताना आकरांची माहिती आपण देऊ शकता.
    लहान - मोठीलहान, मोठा, खूप लहान, खूप मोठा असे आकार त्यांना कळू दे. घरात सगळ्यात उंच आणि सगळ्यात बुटकं कोण आहे ते विचारा. चित्र बघताना लहान प्राणी मोठा प्राणी, लहान शेपटी, मोठी शेपटी कोणाची असे प्रश्न त्यांना विचारा. 
    पोत (प्रकार किंवा गुणधर्म) ओळखणेएखाद्या वस्तूचा पोत कसा असतो आणि तो कसा ओळखायचा हे त्याला कळू दे. झाडाचं खोड मऊ की कडक ? दगड आणि कापड यात मऊ काय ? असे अनेक प्रश्न त्यांना विचारा. 
    वेळवेळ सांगणं मुलासाठी कठीण असतं. पण तुम्ही वेळ सांगून मुलाला घडयाळ दाखवा. झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ त्यांना सांगा. दुपारचं जेवण १ वाजता, रात्रीचं ९ वाजता अशा वेळा त्यांना सांगा. आज, काल, उद्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ, दिवस, आठवडा, महिना, वर्ष हे ही त्यांना शिकवा. अशा गोष्टी शिकवण्यासाठी बालगीतांचा किंवा बडबडगीतांचा आधार घेता येईल.
           

मुलांमधील टिव्ही अॅडिक्शन घालविण्यासाठी

मुलांमधील टिव्ही अॅडिक्शन घालविण्यासाठी

खेडे असो किंवा शहर, आई वडिल आणि मुलगा ही तीनही जण टीव्हीच्या समोर बसून टीव्ही पाहात आहेत, हे चित्र अगदी सर्रास दिसून येते आहे. मुलांनी त्रास देऊ नये, पटकन जेऊन टाकावे म्हणून सुरुवातीला टीव्हीसमोर बसून जेवण्याचे आमिष दाखविले जाते. पण नंतर मात्र, ही गोष्ट सवयीमध्ये कधी बदलते याचा पत्ता लागत नाही. कार्टुन चॅनेलवर दाखविण्यात येणाऱ्या अनेक कार्टुनमध्ये दाखविण्यात येणारा हिंसाचार मुलांच्या वागण्यातही दिसायला लागतो. भीमासारखा लाडू खाल्ला की दुसऱ्याला ठोसा मारायची शक्ती येते, इतकीच गोष्ट मुलांच्या लक्षात राहते. त्यामागचा विचार मुलांना समजण्याइतकी मुले मोठी नसतात. टीव्ही अती पाहण्यामुळे मुलांचा अभ्यास आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांमधील टीव्हीचे व्यसन कमी व्हावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. 
  • वेळावर नियंत्रण - मुलांनी टिव्ही पाहूच नये अशी सक्ती केल्यास मुले टिव्ही पाहणे सोडणार नाहीत, हे लक्षात ठेवले पाहिजे. मुलांनी टिव्ही किती वेळ पाहावा यावर पालकांचा कंट्रोल असायलाच हवा. पालक जो कार्यक्रम पाहतील, तो कार्यक्रम साहजिकपणे मुलेही तोच कार्यक्रम पाहतात. त्यामुळे स्वतः पालकांनीच टिव्ही पाहण्याच्या वेळावर नियंत्रण ठेवले पाहिजे. ठराविक वेळ झाल्यावर टिव्ही बंद करण्याची सवय मुलांना लावण्याचा प्रयत्न करावा.  
  • मुलांसाठी वेळ द्या – अनेकदा पालकांना वेळ नाही म्हणून टिव्ही लावण्यात येतो. ही गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे. मुलांसाठी तुमचा दिवसामधला काही वेळ राखून ठेवा. त्यांच्याशी खेळा, त्यांच्याशी बोला. त्यामुळे मुलांशी संवाद साधला जाईल. 
  • जेवताना टिव्ही नकोच – टिव्हीसमोर बसून जेवण्याने अनेकदा जेवणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे जेवताना टिव्ही नकोच.  
  • अवांतर वाचन आणि खेळ – संध्याकाळी अनेक ठिकाणी मुलांसाठी खेळ आणि व्यायाम घेतला जातो. अशा एखाद्या मैदानावर नाव नोंदविल्यास, टिव्ही पाहण्याचा वेळ आपोआप कमी होतो. त्याचप्रमाणे रोजचा वर्तमानपत्र वाचणे, छोटी गोष्टींची पुस्तके वाचणे या गोष्टी सुरू केल्यास, टिव्ही पाहणे आपोआप कमी होते.